रत्नागिरी, रायगडसाठी दोन कोटी, अन्य पूरग्रस्त जिल्हय़ांसाठी 50 लाखांचा निधी

राज्यातील पूरस्थितीचा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. रत्नागिरी, रायगडसह  राज्यातील 11 जिह्यांची स्थिती यात मांडण्यात आली आहे. पुरातून सावरण्यासाठी रत्नागिरी, रायगडसाठी प्रत्येकी दोन कोटींचा तर पूरग्रस्त अन्य जिह्यांसाठी प्रत्येकी 50 लाखांचा निधी जिल्हाधिकाऱयांना सुपूर्द करण्यात आला आहे.

या अहवालानुसार राज्यातील मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा आणि अकोला या जिह्यांमधील पूरस्थिती आता नियंत्रणात आहे. कोल्हापूर व सांगली जिह्यात अद्यापही काही ठिकाणी पाणी आहे.  सध्या एनडीआरएफच्या 16 तुकडय़ा सहा जिह्यांत तैनात असून सर्वाधिक सहा तुकडय़ा कोल्हापूरमध्ये तर चार तुकडय़ा सांगलीत तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येकी एक संरक्षण दलाची तुकडी या दोन्ही जिह्यांत तैनात करण्यात आली आहे.

349 निवारा केंद्रांत 53 हजार नागरिक

रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिह्यांतील 349 निवारा पेंद्रांत अद्यापही 53 हजार 295 जणांना आसरा देण्यात आला आहे. यात सर्वाधिक 40 हजार 688 जण हे कोल्हापूर जिह्यातील 216 निवारा पेंद्रांत वास्तव्यास आहेत. रत्नागिरीत खेड, चिपळूणमध्ये 695 जण, रायगडात महाड येथे 1555 जण, सांगलीत 7455 जण, साताऱयात 2902 जण निवारा पेंद्रांत आश्रयाला आहेत.

पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये

राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

चार लाख 35 हजार नागरिकांचे स्थलांतर

पूरग्रस्त तसेच दरडग्रस्त भागातील चार लाख 35 हजार 879 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात रत्नागिरीत 1200, साताऱयात 49 हजार 149, ठाण्यात 6930, कोल्हापूरमध्ये 1 लाख 62 हजार 564, सांगलीत दोन लाख 11 हजार 808, पुण्यात 402, रायगड 2555, सिंधुदुर्गात 1271 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या