रत्नागिरीत सहा दिवसांनी दुकाने उघडली, बाजारात गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रेक द चेन च्या नियमावलीत बदल करून आजपासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्याची परवानगी दिल्यानंतर आज सकाळी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत गर्दी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात गेले सहा दिवस अत्यावश्यक सेवेवरही निर्बंध होते त्यामुळे ही सर्व दुकाने सहा दिवसानंतर उघडली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्याने आणि मृत्यूची संख्याही वाढल्याने जिल्हा प्रशासनाने 16 एप्रिल पासून अत्यावश्यक सेवांवरही निर्बंध घालून केवळ घरपोच सेवेवर भर दिला होता. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. आज सकाळी 7 वाजल्यापासून दुकाने उघडण्यास सुरूवात केल्यानंतर बाजारात गर्दी झाली. भाजीपाला, किराणा खरेदी झाली होती. 11 वाजल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या.दुकाने बंद होताच हळूहळू गर्दी ओसरली.