रत्नागिरी- कळंबणीतील पाच जणांना स्वाईन फ्ल्यू

447

कोरोना संशयित म्हणून रूग्णालयात दाखल केलेल्या नऊ जणांची तपासणी केल्यानंतर त्यांचे कोरोना निगेटिव्ह अहवाल आले मात्र त्या नऊ पैकी पाच जणांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे आरोग्य तपासणीत निष्पन्न झाले आहे. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातून या पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 5 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित एक रूग्ण सापडला असून उर्वरित सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या 735 जण होम क्वॉरंटाईन आहेत. जिल्ह्यात संचारबंदीची काटेकोर अमंलबजावणी सुरू असून रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद आहेत. गर्दी टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात दुचाकी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारपासून रत्नागिरीत गर्दी कमी झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने हेल्पिंग हॅण्डस् यांच्या सहकार्यांने किराणा आणि औषधे अशा जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची योजना सुरु केली आहे.त्याकरीता सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच सेवेसाठी मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत. भाजीपाला शहरातील विविध भागात उपलब्ध करून गर्दी टाळण्यावर भर दिला आहे. रत्नागिरी नगरपरिषद, चिपळूण नगरपरिषदेने शहरात फवारणी करून निर्जतुंकीकरण करण्यावर भर दिला आहे. रत्नागिरी शहरातील छोट्या रस्त्यांवरही फवारणी करण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनीही गावात फवारणी करून निर्जंतुकीकरण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या