
अजित दादा यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्यात गुन्हा दाखल करावा अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच अजित पवार हे काँग्रेसचेच प्रोडक्शन आहे, त्यामुळे काँग्रेसवर अशा पद्धतीने टीका कोणी करावी याचे आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपूरत केलं पाहिजे अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, बारामती निवडणुकीबाबत संजय राऊत म्हणाले की, जनभावना काय याची व्याख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा सांगावी. नांदेडमध्ये वसंत चव्हाणांचा दुर्दैवी निधन झालं तेव्हा उमेदवार देताना जनभावना नव्हती. पंढरपूरला आमदार नाना भाळके निधन झालं तेव्हा उमेदवार उभा करताना जनभावना नव्हती. अशा जनभावना पायदळी भाजपने कशा तुडवल्या याची अनेक उदाहरणे आम्हाला देता येतील. देवेंद्रजी तुम्ही तिकडे तामिळनाडू कुठेतरी प्रचारामध्ये आहात आणि तिथून महाराष्ट्राची जनभावना काय सांगता?
तसेच पार्थ पवार अजित पवारांचे चिरंजीव आहेत. त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांना उत्तर देणारच ना. आणि शरद पवार काय अजित पवार हे मूळ काँग्रेसवालेच आहेत. पार्थ पवार यांनी आपले वडिल अजित पवारांचा राजकीय इतिहास समजून घेतला पाहिजे. अजित पवार हे काँग्रेसचेच प्रोडक्शन आहेत. शरद पवारांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली आहे आणि आजही ते काँग्रेस विचारानेच काम करतायत. काँग्रेस पक्ष या देशातला नव्हे तर जगातला एका देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान असलेला हा पक्ष आहे. आणि या काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांना आजही जगात मान्यता आहे. मग महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी हे सगळे प्रमुख नेते आहेत. या सगळ्यांना आजही जगामध्ये प्रतिष्ठा आहे. त्यामुळे काँग्रेस वर अशा पद्धतीने टीका कोणी करावी याचे आत्मचिंतन टीका करणाऱ्यांनी स्वतःपूरत केलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. बारामती पोटनिवडणूक आम्हालाही वाटत होतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्षाची आहे. काँग्रेसला 25 मतं पडतील, तुम्हाला 25 लाख पडतील. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे. तुम्हाला का वाटतय की बिनविरोध व्हायला पाहिजे? मत द्यायचं की नाही हे लोकं ठरवतील असेही संजय राऊत म्हणाले. जर तुम्हाला अजित दादांविषयी खरोखरच इतका प्रेमाचा पान्हा फुटला असेल तर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे, ”आम्ही माघार घेतो अजित दादांच्या मृत्यू संदर्भातला गुन्हा महाराष्ट्रात दाखल करा” मग गुन्हा का दाखल करत नाहीत? तुम्ही काँग्रेसला धडा शिकवायला निघालात ना? आमची भूमिका स्पष्ट आहे, अजितदादा पवार यांचा ज्या संशयास्पदरीतीने अपघाती मृत्यू झाला, त्या संदर्भात रोहित पवारांनी आणि अजित दादाचे चिरंजीव जय पवार यांनी जो संशय व्यक्त केलेला त्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावा आणि गुन्हा दाखल करावा. अजित दादा तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे प्रिय भाजपचे समर्थक आहेत ना. त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या आजही तुमच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पतीच्या या निधनासंदर्भात तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तुम्ही आम्हाला काय ज्ञान देता? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.




























































