अजित पवारांच्या मृत्यूवर संशय व्यक्त करणाऱ्यांना धमक्या देऊ नका – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या संशयाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे असून पवार कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे विलिनीकरण असो किंवा अजित पवारांच्या अपघाताबाबतचे प्रश्न असोत, कुटुंबातील व्यक्ती बोलत असल्याने त्यांचे मत अधिक विश्वासार्ह ठरते. “ते जे काही बोलतात ते तुम्ही ऐका, मीही ऐकतो,” असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शंका व्यक्त केल्या आहेत. छगन भुजबळ यांनाही संशय आहे. आता रोहित पवारांसारख्या कुटुंबातील सदस्यालाही संशय वाटतो आहे. खासदार बजरंग सोनावणे यांनीही संशय व्यक्त केला आहे. अशा वेळी त्या संशयाचे निराकरण करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत की, “अजित पवारांच्या मृत्यूवर कोणी राजकारण केलं तर याद राखा.” यावर राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला, “मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? ते कशाच्या आधारावर धमक्या देत आहेत? त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना, सहकाऱ्यांना जर काही शंका असतील, तर त्याने मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना होण्याचे कारण काय?”

ते म्हणाले की, अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र दुःखात आहे. आजही लोक शोकमग्न आहेत आणि त्यांना विश्वास बसत नाही की असे काही घडू शकते. अशा प्रकारच्या घटनांनंतर विविध कंगोरे निर्माण होतात, प्रश्न उपस्थित होतात. मात्र राज्याचे मुख्यमंत्री वारंवार विचारतात की, “राजकारण कोण करतंय? आम्हाला सांगा.”

राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील संसदेतल्या घटनांचा उल्लेख करत टीका केली. “जेव्हा पंतप्रधान संसदेत असतात आणि विरोधी पक्षाचे लोक आंदोलन करतात, तेव्हा त्यांच्या हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जातो. तेव्हा तुमचे ओम बिर्ला आणि भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असे म्हणतात. पंतप्रधान जिवंत आणि सुरक्षित असतानाही तुम्हाला संशय येतो. मग आमचा एक महत्त्वाचा नेता अपघातात मृत्यूमुखी पडला आणि त्याबाबत शंका व्यक्त केल्या तर तुम्ही अस्वस्थ का होता? तुमचा त्यात काही हात आहे का, असा संशय लोकांच्या मनात निर्माण होतो,” असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “जर नरेंद्र मोदींच्या संदर्भात काहीही घडलं नसताना हल्ल्याचा कट असल्याची चर्चा केली जाते, तेव्हा ते राजकारण नसतं. पण अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीचा अपघाती आणि संशयास्पद मृत्यू झाला, तर त्यावर आम्ही बोलायचं नाही, ही मुस्कटदाबी आहे का?”

राऊत यांनी पत्रकारांना या प्रकरणाचा शोध घेण्याचे आवाहन केले. “जेव्हा वारंवार अशा प्रकारची वक्तव्ये येतात, तेव्हा समोरच्या व्यक्तींना संशय येतो. आमच्या घरातील माणूस गेला आणि तुम्ही म्हणता गप्प बसा. पत्रकारांनी शोधक पत्रकारिता करावी. रोहित पवार काय सांगत आहेत, याकडे माझे लक्ष आहे, कारण ते अधिक विश्वासार्ह असेल. बजरंग सोनावणे, छगन भुजबळ, अमोल मिटकरी हे सर्व जबाबदारीने बोलत असतात. आपल्या आमदारांवरच डाफरून त्यांना गप्प बसायला सांगणे योग्य नाही,” असे त्यांनी सांगितले.