
अमेरिका- इस्रायल- इराण युद्धबंदीचे श्रेय पाकिस्तानला, ही मोदी काळामध्ये हिंदुस्थानला मारलेली ही सगळ्यात मोठी चपराक आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच सगळ्यात आधी कॅबिनेटमध्ये जयशंकर सारखे जे माकड आहेत त्यांना दूर केलं पाहिजे असा टोलाही संजय राऊत लगावला.
संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण जगाचा विध्वंस होईल अशा प्रकारचे युद्ध सुरू होतं. हजारो लोक मारले गेले. पण इराण सारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेसारख्या महाशक्तींना शरण गेला नाही. 35 दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिका आणि इस्रायला झुंजत ठेवलं. आणि जगात अमेरिका, इस्रायलविषयी जी फाल्तू भिती होती, ती भिती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं, राज्यकर्त्यांनी, जनतेनं कसं बलिदान करावं हे इराणने जगाला दाखवून दिलं. तरीही इराणचं नुकसान झालं. त्याहीपेक्षा इस्रायलचं नुकसान झालं. आणि ट्रम्पसारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. पण शेवटी युद्धात मध्यस्थ करण्याचं श्रेय पाकिस्तानला जातं. या निमित्ताने पाकिस्तान जगाच्या नकाशावर आलं आहे. हे श्रेय नरेंद्र मोदींनी घ्यायला पाहिजे होतं. हे श्रेय महाविश्वगुरुला मिळायला हवं होतं की, आम्ही हे युद्ध थांबवलं, ट्रम्प इराणचे राज्यकर्ते आणि इस्रायलचा नेत्यानाहू यांना आम्ही एका टेबलावर आणलं आणि जगामध्ये शांततेचा संदेश दिला. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिकाच नाही. तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरु केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती शब्दबॉम्ब टाकत होते. आणि यांची हत्यार काय निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचं काम आमचे महाविश्वगुरु करत होते. आणि तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचे श्रेय हे चीन आणि पाकिस्तानने घेतलं. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात तिथे तुम्ही भाजपचा झेंडा फडकवणार होतात, तिथे प्रेसिडेंट ट्र्म्प, नेतन्याहू, इराणचे राज्यकर्ते बसून जागतिक शांततेवर चर्चा करणार. ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हे कसले विश्वगुरु, महाविश्वगुरु? पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे प्राप्त झाली त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार आहे, त्यांचं सरकार हे भंपक आणि डरपोक आहे असेही संजय राऊत म्हणाले.
अमेरिका आणि इस्रायल संघर्ष थांबला. यावर संजय राऊत म्हणाले की, हे म्हणजे खऱ्या अर्थाने ‘वॉर रुकवादी पापा.’ युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरूच आहे. आणि आता या क्षणी प्रेसिडेंट ट्रम्प जर पाकिस्तानचे आभार मानत असेल, तर ही मोदींना मारलेली चपराक आहे. प्रेसिडेंट ट्रम्प हे जर पाकिस्तानला, चीनला थँक्यू म्हणत आहेत आणि हे दोन्ही आमचे शत्रू राष्ट्र आहेत. ही तर मोदी काळामध्ये भारताला मारलेली ही सगळ्यात मोठी चपराक आहे. खरं म्हणजे मोदींना आता सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाहीये. या काळामध्ये हिंदुस्थानची अवस्था मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली. इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्तानचे पंतप्रधान टेलिकॉम ऑपरेटरचे काम करत होते. ”आज मी सौदी अरेबियाच्या प्रिन्स, जॉर्डनचे राष्ट्राध्यक्ष व राजा, तसेच नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. तसेच दुबईच्या शेख आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही मी संवाद साधला.” पण युद्ध थांबवण्याच श्रेय पाकिस्तानला मिळालं. ज्या पाकिस्तानाचा उल्लेख परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दलाल असा केला त्या दलाल राष्ट्राला युद्ध थांबवण्याच श्रेय ट्रम्पने दिलं. सगळ्यात आधी जयशंकरने राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखत आहात. सगळ्यात आधी जयशंकर सारखे जे माकड आहेत हिंदुस्थानच्या कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये त्यांना दूर केलं पाहिजे, त्यांच्यामुळे देशाची नाचक्की झालेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या SIR प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांची मतं कापली आणि हे मुसलमान या देशाचे अधिकृत नागरिक आहेत. बंगालमध्ये 92 लाख मत मुस्लिमांची कापली आणि हे सर्व मतदार हे या देशाचे अधिकृत वर्ष पिढ्यान पिढ्या राहिलेले या देशाचे नागरिक आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ममता बॅनर्जींचा पराभव करणार. अशा पद्धतीने तुम्ही बिहारमध्ये तेजस्वी यादवांचा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा पराभव घडवून आणला. आणि याचे सूत्रधार आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आहेत. या ज्ञानेश कुमार विरुद्ध 192 खासदारांनी सह्या करूनमहाभियोग चालवण्यासाठी impeachment motion दिला . नरेंद्र मोदीच्या दबावाखाली उपराष्ट्रपतींनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीन हा 192 खासदारांचा सह्या असलेला ठराव फेटाळून लावला असेही संजय राऊत म्हणाले.




























































