आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका…रविना टंडन बरळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

देशभरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अभिनेत्री रविना टंडनने टीका केली आहे. ‘किती वाईट घटना आहे ही. आंदोलन करण्याची किती भयंकर पद्धत आहे ही. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहीत्याचं नुकसान करणाऱ्या आंदोलकांना ताबडतोब तुरुंगात टाका. त्यांना जामीनही देऊ नका.’ असे वादग्रस्त विधान अभिनेत्री रविना टंडनने केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रविनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे.

शेतमालाला, दूधाला योग्य भाव, कर्जमाफी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. आपला हा रोष दर्शवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी दूध व टोमेटो, भाजी रस्त्यावर फेकत सरकारचा निषेध केला आहे. यावरून रविनाने आंदोलकांवर ही टीका केली आहे. रविनाच्या या ट्वीटला अनेकांनी  सडेतोड उत्तर दिले आहे. तर काहीजणांनी तिचे समर्थनही केले आहे.

यावर रविनाने शेतकरीविरोधातच आपली भूमिका मांडली. यामुळे अनेकजण तिच्यावर नाराज झाले आहेत. काहीजणांनी तिला शेतकऱ्यांप्रती आदर दाखवणे शिकण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकजणांनी तिचे विधान योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.