ट्रोल होण्याच्या भीतीने मराठी कलाकार ठाम भूमिका घेत नाहीत – रवी जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी पाटकर

नटरंग, बालगंधर्व, बालक पालक, न्यूड, टाईमपास अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारे मराठी दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. विषयाचं वैविध्य, संवेदनशील हाताळणी, तितकंच प्रभावी सादरीकरण ही रवी जाधव यांच्या चित्रपटाची वैशिष्ट्य. आता रवी हे वेबसीरिज या माध्यमात पाऊल टाकत असून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावरील ताली या बायो वेबसिरीजची निवड केली आहे. या सीरिजविषयी सामना ऑनलाईनशी त्यांनी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. सीरीजच्या विषयापासून ते मराठी चित्रपट आणि कलाकारांबाबतही त्यांनी आपली मतंही मांडली.

बालगंधर्वनंतर खूप काळाने आपल्या बायोपिक करायचा होता आणि त्यावेळी ताली सारखी आलेली संधी आपण हातची जाऊ दिली नाही, असं रवी जाधव म्हणाले. सुश्मिता सेन ही अत्यंत गुणी अभिनेत्री आपल्याला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त करताना तिने केलेल्या मेहनतीचा उलगडाही त्यांनी यावेळी केला. अतिशय शिस्तप्रिय असलेली सुश्मिता ही वेळेवर सेटवर हजर होत असे. एखादा सीन जास्त उत्तम व्हावा यासाठी तिचा कटाक्ष असायचा. जेव्हा तिला पुरुषाच्या रुपात दाखवायचं होतं तेव्हा दिवस-दिवस ती छातीला पॅडिंग लावून बसत असायची. अगदी खरोखर पुरुष वाटावा यासाठी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारं सेंटरगार्डही तिने वापरलं. पुरुषासारखा आवाज वाटावा म्हणून वेगवेगळ्या पिचेसमध्ये आवाज रेकॉर्ड करून ती पाठवत असे. अगदी अँजिओप्लास्टी झाल्याच्या काही दिवसांतच तिने डबिंगला सुरुवात केली होती, अशी आठवण रवी जाधव यांनी यावेळी सांगितली.

ऑनलाईन कन्टेंटविषयी विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली. ऑनलाईन माध्यमावर लैंगिक आशयाचे आणि धाटणीचे व्हिडीओ अधिक आहेत का, या प्रश्नावर बोलताना रवी म्हणाले की, हो. हे खरं आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ ओटीटीवर आहेत. मी त्यांना अजिबात नावं ठेवणार नाही. कारण, अशा प्रकारचे व्हिडीओ बनवून विकणं ही काहींची रोजीरोटी आहे. त्यामुळे मी त्याला वाईट म्हणू शकत नाही. पण, मला स्वतःला कधीच असे व्हिडीओ बनवायला आवडणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दाक्षिणात्य कलाकार हे मराठी किंवा हिंदी कलाकारांपेक्षा अधिक ठामपणे आपल्या राजकीय-सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडतात का, या प्रश्नावरही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. दाक्षिणात्य कलाकारांना तुफान लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्यापाठी कोट्यवधी प्रेक्षकांचं पाठबळ असतं. त्या पाठबळावरच ते काही कोटींचं मानधन मागतात. ते इतकं मानधन मागू शकतात कारण त्यांना त्यांच्या प्रेक्षकांवर विश्वास असतो की आपले प्रेक्षक चित्रपटाला यश देतील. तसंच एखाद्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवरही ठामपणे भूमिका मांडतानाही, त्यांचा पाठिंबा कलाकाराला मिळत असतो. हे चित्र मराठीत दिसत नाही, कारण, इथे क्वचित एखादा चित्रपट कोट्यवधींमध्ये कमावतो. हे चित्र बदलण्यासाठी चित्रपट हिट करणं, त्यासाठी ते चित्रपट गृहांमध्ये जाऊन पाहणं, त्यापूर्वी चांगले चित्रपट येणं हे सगळं सगळं गरजेचं आहे. जेव्हा हे वर्तुळ पूर्ण होईल, तेव्हा हे चित्र निश्चित बदललेलं असेल.

सामाजिक प्रश्नांवर किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी मराठी कलाकार अगदी ठामपणे मदतीला धावून जातात. अगदी अनामिकपणेही लोकांना मदत करतात, हे मी स्वतः पाहिलं आहे. पण, सध्या सोशल मीडियावर वाढलेल्या ट्रोलिंगच्या भीतीमुळे मराठी कलाकार राजकीय बाबतीत ठाम भूमिका घेत नाहीत. कारण, त्यांच्या चाहत्यांना ते त्या राजकीय विचारधारेचे वाटतील, ही धास्ती त्यांच्या मनात असते, असंही रवी जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.