
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी आदी बऱयाच गंभीर गुन्हय़ांत सहभागी असलेला व गेल्या दोन दशकांपासून मुंबईसह साऱया देशभरातील पोलिसांना हुलकावणी देणाऱया रवी पुजारी या मोस्ट वॉण्टेड गुंडाला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमधून ‘रॉ’ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने बंगलोर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतील व्यावसायिकांना मोठय़ा प्रमाणात परदेशातून खंडणीसाठी धमकावणाऱया रवी पुजारीला गेल्या वर्षी सेनेगलमध्ये दाढी करताना अटक करण्यात आली होती, परंतु जामिनावर सुटलेल्या रवी पुजारीने त्यानंतर पलायन केले होते. अखेर हिंदुस्थानच्या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने कर्नाटक पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली.
रवी पुजारी हा अंधेरी (पूर्व) येथील चकाला येथे पूर्वी राहत होता, परंतु खंडणीच्या व्यवसायात त्याचा जम बसल्यानंतर त्याने आपली पत्नी पद्मा व मुलांना लंडनमध्ये बोलावून त्यांना त्याच ठिकाणी स्थायिक केले. छोटा राजन टोळीतून फुटलेल्या या गुंडाचा खंडणी वसुलीच्या व्यवसायात हातखंडा आहे. सुमारे 100च्याही वर खंडणीच्या केसेसमध्ये वॉण्टेड असलेला हा गुंड सापडल्याने ‘पुजारी’ टोळीला प्रचंड हादरा बसला आहे.


























































