क्रिकेट इतिहासात दिग्गजांना जमलं नाही, ते हिंदुस्थानी खेळाडूने पदार्पणात करून दाखवलं

3719

सलग तीन चेंडूवर तीन बळी घेऊन हॅटट्रीक नोंदवण्याचं प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं… आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीत स्वप्न पूर्ण झालं तर यासारखी भन्नाट सुरुवात असूच शकत नाही. एवढेच नाही तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीत पहिल्याच षटकात हॅटट्रीक मिळाली तर मग ‘सोने पे सुहागा’. आजपर्यंत असा विक्रम जगातील कोणत्याही दिग्गज गोलंदाजाला जमलेला नाही, मात्र हिंदुस्थानच्या एका खेळाडूने तो करून दाखवला आहे.

रणजी ट्रॉफीदरम्यान एका खेळाडूने असा विश्वविक्रम केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीत पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. हा एक विश्वक्रम असून ही कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाचे नाव आहे रवी यादव. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असणारा 28 वर्षीय रवी यादव याने मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे पदार्पणाचा सामनाही त्याला उत्तर प्रदेशविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या लढतीत त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर बळी घेत विश्वविक्रमी हॅटट्रीक नोंदवली.

इंदूरमध्ये मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये नुकताच रणजी सामना खेळला गेला. या लढतीत रवी यादव याला गोलंदाजीची संधी मिळाली. संधीचे सोने तर रवीने फर्स्ट क्लासमधील आपल्या पहिल्याच षटकातीस तिसऱ्या चेंडूवर उत्तर प्रदेशच्या आर्यन जुआलला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढील दोन चेंडूवर अंकित राजपूत (0) आणि समीर रिझवी (0) यांना बोल्ड करत इतिहास रचला.

आकडे काय सांगतात?
क्रिकेटमधील विक्रमांच्या पोतडीमध्ये पाहिले असता 80 वर्षांपूर्वी (1939-40) दक्षिण आफ्रिकन गोलंदाज रिकी फिलिप्स यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्याच षटकात हॅटट्रीक घेतली होती. परंतु त्यांनी त्याआधी चार लढती खेळल्या होत्या, परंतु गोलंदाजीची संधी मात्र त्यांना मिळाली नव्हती. जेव्हा त्यांनी हॅटट्रीक घेतली तेव्हा ते पाचवा सामना खेळत होते.

डेब्यूमध्ये हॅटट्रीक घेणारे हिंदुस्थानी खेळाडू
हिंदुस्थान गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास रवीसह सात गोलंदाजांनी फर्स्ट क्लासमध्ये पदार्पणाच्या लढतीत हॅटट्रीक घेतली आहे. यात जवागल श्रीनाथ, सलिल अंकोला, अभिमन्यू मिथून यांच्याही नावाचा समावेश आहे. परंतु रवी यादवची हॅटट्रीक या सर्वांपेक्षा वेगळी आहे, कारण त्याने आपल्या पहिल्याच षटकात ती घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या