
हिंदुस्थानच्या अष्टपैलू रवींद्र जाडेजाने आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलूंच्या क्रमवारीत 1151 दिवस नंबर वन स्थान पटकावत नवा इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दीर्घकाळ अव्वल स्थान कायम राखणारा जाडेजा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
तीन वर्षांपूर्वी म्हणजे 9 मार्च 2022 ला वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकत जाडेजाने अव्वल स्थानी झेप घेतली होती आणि ते स्थान आजही कायम राखले आहे. या पराक्रमासह जाडेजाने अष्टपैलू जॅक पॅलिस, कपिल देव, इम्रान खान यांनाही मागे टाकले आहे. मार्च 2022 पासून जाडेजाने 23 कसोटींत 36.71 च्या सरासरीने 1175 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजीत 22.34 च्या सरासरीने 91 विकेटही टिपल्या आहेत. ज्यात 6 वेळा डावात पाच विकेट तर दोनदा कसोटीत दहा विकेट टिपण्याची किमया त्याने करून दाखवली आहे. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत 86 धावा आणि 5 विकेट टिपण्याची कामगिरी करत आपले क्रमवारीतील गुणांना 475 पर्यंत वर नेले होते. आता तो 400 गुणांसह अव्वल असून बांगलादेशचा मेहिदी हसन 327 गुणांसह दुसऱया क्रमांकावर आहे.