
सामना प्रतिनिधी । मालवण
सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस सप्ताहाचे (रेझिंग डे) आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मालवण येथील रॉक गार्डन येथे बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर करून मालवणवासियांसह पर्यटकांची मने जिंकली. जयोस्तुते, ये मेरे वतन के लोगो, गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्यांना उपस्थितांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक सुदेश आचरेकर, नितीन वाळके, दीपक पाटकर, पंकज साधये, पूजा सरकारे, पूजा करलकर आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षांनी बँड पथकाचे विशेष कौतुक केले.
पोलीस दलाच्या कार्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी पोलीस सप्ताह म्हणजेच ‘रेझिंग डे’ साजरा केला जात आहे. यानिमित्त रॉक गार्डन येथे पोलीस दलाच्या बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर करून मंत्रमुग्ध केले. तर हौशी रसिकांच्या ‘फरमायिशा’ही सादर केल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपनीय विभागाचे रुपेश सारंग, तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.





























































