गृहकर्ज स्वस्त होणार, रेपोरेटमध्ये 0.25 टक्के कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेने आज आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रेपोरेटमध्ये 0.25 टक्के कपात केली आहे. रेपोरेट आता 6.50 वरून 6.25 टक्के झाला आहे. त्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. तब्बल 18 महिन्यांनी रेपोरेटमध्ये कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक झाली. सहापैकी चार सदस्यांनी रेपोरेट कमी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले तर, वीरल आचार्य आणि चेतन घाटे यांनी विरोध केला. त्यामुळे बहुमताने रेपोरेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेपोरेट 6.25 टक्के झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. गृह आणि वाहनकर्ज स्वस्त होणार. रिव्हर्स रेपोरेटमध्येही 0.25 टक्के कपात केली आहे. हा दर 6 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना पतपुरवठा केला जातो त्याला रेपोरेट म्हणतात. कमी दराने पतपुरवठा मिळाल्यास त्याचा फायदा बँकांना होतो. त्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. बँकांकडून रिझर्व्ह बँकेत काही ठेव जमा केली जाते. त्यावर बँकेला जे व्याज मिळते त्याला रिव्हर्स रेपोरेट म्हणतात.

गॅरंटी फ्री कर्ज योजना मर्यादा वाढली
रिझर्व्ह बँकेने पडिक जमीनधारक शेतकऱयांनाही दिलासा दिला असून गॅरंटी फ्री कर्ज योजनेची मर्यादा 60 हजारांनी वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱयांना आता 1 लाख 60 हजार रुपये कर्ज मिळू शकते.

शेतकऱयांना विनातारण 1.60 लाखांपर्यंत कर्ज
बँकाकडून शेतकऱयांना विनातारण कर्ज देण्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता 1.60 लाखांपर्यंत विनातारण कर्ज मिळेल. याआधी एक लाखापर्यंत मिळत होते.

महागाई वाढणार
डिसेंबर 2018 मध्ये महागाईचा दर 2.19 टक्के होता. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये हा दर 3.2 ते 3.4 टक्के असेल, असे पतधोरणात म्हटले आहे. त्यामुळे महागाई वाढणार आहे.