
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील सहा आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षात युद्धविराम झाल्यामुळे जागतिक स्तरावर सुधारणा होईल, या आशेने रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात कोणताही बदल केला नाही. व्याजदरात कोणतेही बदल करण्यात येण्याची शक्यता कमी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दीड महिना चाललेल्या आखातातील संघर्षामुळे ऊर्जेचा पुरवठा विस्कळीत झाला, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि हिंदुस्थानसारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर महागाईचा दबाव निर्माण झाला. त्या पार्श्वभूमीवर हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात सरकारने आरबीआयसाठी महागाईचे नवीन लक्ष्य जाहीर केल्यानंतरचा हा पहिलाच पतधोरण आढावा आहे. सरकारने आरबीआयला मार्च २०३१ पर्यंत पुढील पाच वर्षांसाठी किरकोळ महागाई ४ टक्के राखण्यास सांगितले आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, पतधोरण समितीने (MPC) सर्वसंमतीने अल्पकालीन कर्ज दर म्हणजेच ‘रेपो रेट’ ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा आणि ‘तटस्थ’ भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ३.२१ टक्क्यांवर आली होती, जी आरबीआयच्या ४ टक्क्यांच्या मध्यम मुदतीच्या लक्ष्याच्या जवळ आहे. त्यामुळे दर कपातीला स्थगिती देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, युद्ध सुरू झाल्यापासून रुपयाचे मूल्य ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहे, ज्याचा परिणाम आयात महागाई वाढण्यावर होतो. मात्र, अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर रुपया ५० पैशांनी वधारून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९२.५६ वर पोहोचला आहे.
पतधोरण समितीच्या शिफारशीनुसार, आरबीआयने किरकोळ महागाई कमी होत असताना फेब्रुवारी, एप्रिल आणि डिसेंबर २०२५ मध्ये रेपो दरात प्रत्येकी २५ बेसिस पॉइंट्स आणि जूनमध्ये ५० बेसिस पॉइंट्सची कपात केली होती.
ऑक्टोबर २०२५ मध्ये हिंदुस्थानची किरकोळ महागाई ऐतिहासिक नीचांकी ०.२५ टक्क्यांवर आली होती, जी कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर मालिका सुरू झाल्यापासूनची सर्वात कमी पातळी होती.
तर गेल्या महिन्यात रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आणि डॉलरच्या तुलनेत ९५ च्या पार गेला, ज्यामुळे आयात महाग झाली आणि महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली. ३० मार्च २०२६ रोजी रुपया ९५.२१ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला होता.





























































