
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देत आणखी एका बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्यानंतर दोन दिवसांत रिझर्व्ह बँकेने आर्थिक अनियमिततेचे कारण देत या बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत.
चेन्नईत मुख्यालय असलेल्या 93 वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात 569 शाखा आहेत. त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर आता लक्ष्मी विलास बँकेचीही त्यात भर पडली आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणे आहेत असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेकडे असलेल्या मुदत ठेवीतील रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार रेलिगेअर फिनव्हेस्ट कंपनीने केला आहे. आघाडीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या लक्ष्मी विलास बँकेत 790 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातील रकमेचा बँकेच्या संचालकांनी गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
























































