समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध; व्यवहार ठप्प, संतप्त ठेवीदारांनी कर्मचाऱ्यांना कोंडले; रक्कम न मिळाल्यास बँक फोडण्याचा इशारा

सोलापूर, पुणे, सांगली येथे विस्तार असलेल्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले असून, बँक व्यवहार ठप्प झाले आहेत. सकाळी ठेवीदार व ग्राहक रक्कम घेण्यासाठी बँकेच्या शाखेत गेले असता, रक्कम न मिळाल्याने संतप्त ठेवीदारांनी कर्मचाऱयांना कोंडून ठेवले होते. काही ठेवीदारांनी रक्कम न मिळाल्यास बँक फोडण्याचा इशारा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. दत्त चौक व दमाणीनगर, सात रस्ता परिसरातील शाखेसह अन्य शाखांत रक्कम न मिळाल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

सोलापूरसह राज्यात एके काळी ठेवींमध्ये अग्रेसर असलेल्या श्री समर्थ सहकारी बँकेला गेल्या चार वर्षांपासून घरघर लागली आहे. रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी थकबाकी आणि बँक व्यवहारप्रकरणी नोटिसा बजावल्या आहेत. तरीही कामकाज व कर्जवसुली थंडावल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने मंगळवारी सायंकाळी बँकेवर निर्बंध घातल्याची नोटीस धाडली. कर्जमंजुरी, ठेवी स्वीकारणे, निधी वितरण, कोणतीही मालमत्ता विक्री न करणे यांसह अनेक प्रकारची निर्बंधांची कारवाई बँक कायदा-1949 कलम 56सह कलम 35-‘अ’च्या उपकलम 1अंतर्गत करण्यात आली आहे.

आरबीआयने बँकेवर कारवाई केल्याची माहिती ठेवीदार व ग्राहकांना कळताच सकाळपासूनच दत्त चौक, दमाणीनगर, सात रस्ता यांसह विविध शाखांसमोर रक्कम व ठेवी काढून घेण्यासाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. मोलमजुरी करणारे, भाजीविक्रेते, नोकरदारांसह विविध वर्गांतील ग्राहक बँकेसमोर रक्कम काढण्यासाठी ठिय्या मारून बसले होते. काही शाखांमध्ये कर्मचारी आरबीआयची नोटीस चिकटवून बँक बंद करून जाण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त ठेवीदारांनी त्यांना आतच कोंडून ठेवले. ‘आमची रक्कम द्या, त्यानंतरच बाहेर पडा,’ असे त्यांनी सुनावले. बँक डबघाईला आलेली असताना व आरबीआयची कारवाई सुरू असल्याची माहिती बँकेने लपवून ठेवल्याचा आरोप करत ठेवीदारांनी संचालकांना जबाबदार
धरले होते.

बँक स्थापन होऊन 29 वर्षे झाली आहेत. कोजागरी पौर्णिमा वर्धापनदिन असून, त्याच दिवशी श्री समर्थ बँकेवर कारवाई झाल्याने चर्चा होत आहे. बँकेच्या सोलापूर, पुणे, सांगलीसह 35 शाखा आहेत. बँकेच्या डबघाईला पदाधिकारी व संचालक जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, बँकेचे चेअरमन दिलीप अत्रे यांनी ठेवीदार व ग्राहकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. बँकेत ठेवींची संख्या वाढत असून, कर्जवसुलीही होत आहे. त्यामुळे आरबीआयचे निर्बंध लवकरच उठतील व तसा पत्रव्यवहार सुरू आहे, असे अत्रे यांनी सांगितले.