ही शांतता अनुपस्थिती नव्हती, शोक होता! आरसीबीचा भावनिक संदेश

शांतता ही अनुपस्थिती नव्हती, ती शोकाची होती… असे शब्द कर्नाटकच्या अभिमान मानल्या जाणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने अखेर व्यक्त केले. आयपीएलमधील पहिल्या विजयानंतर झालेल्या जल्लोषावेळी 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा मृत्यू झाला आणि पन्नासहून अधिक जखमी झाले होते. त्या घटनेनंतर तब्बल तीन महिने आरसीबी गप्प होती. आता संघानेच आपल्या चाहत्यांसमोर भावनिक संदेश ठेवत ही शांतता ‘शोकाची’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यांनी अखेर मौन सोडले

 ही जागा कधी ऊर्जा, आठवणी आणि आनंदाने भरलेली होती… पण 4 जूनच्या त्या घटनेनंतर सर्व काही बदलले. त्या दिवसाने आमचे हृदय पिळवटले. त्यानंतर आलेली शांतता ही आमची पोकळी नव्हे, तर आमच्या दुःखाचा भाग होती, अशी आरसीबीने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या शांततेत आम्ही शोक करत होतो, शिकत होतो आणि हळूहळू एक अर्थपूर्ण मंच घडवत होतो. ‘आरसी’ नावाचा. हा मंच चाहत्यांसाठी, त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी तयार झाला आहे, असेही संघाने नमूद केले.

चेंगराचेंगरीला जबाबदार ठरलेली फ्रेंचायझी

या दुर्घटनेनंतर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) थेट आरसीबीला जबाबदार धरले होते. 3 ते 5 लाखांच्या गर्दीचा अंदाज होता, परंतु आरसीबीने ना पोलिसांची परवानगी घेतली ना संमती. एवढय़ा मोठय़ा जमावाचे व्यवस्थापन करणे अवघडच होते, असे निरीक्षण न्यायाधिकरणाने नोंदवले.

पोलीससुद्धा माणसे आहेत, देव नाहीत

‘कॅट’ने दिलेल्या आदेशात म्हटले आहे, ‘पोलीससुद्धा माणसे आहेत. ते ना देव आहेत, ना जादूगार. त्यांच्या हातात ‘अलादिनचा दिवा’ नाही की इच्छा ताबडतोब पूर्ण करता येईल.’ अशा शब्दांत न्यायाधिकरणाने पोलिसांच्या बचावाला आधार दिला.

निलंबन रद्द, चौकशी सुरूच

कर्नाटक सरकारने या प्रकरणानंतर निलंबित केलेल्या चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांचे निलंबन रद्द केले आहे. त्यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक बी. दयानंद, आयपीएस शेखर एच. टेक्कन्नावर, उपअधीक्षक सी. बालकृष्ण आणि निरीक्षक ए. के. गिरीश यांचा समावेश आहे. चौकशी अद्याप सुरू असून सर्व अधिकारी कामावर परतले आहेत.

स्टेडियम मोठय़ा कार्यक्रमांसाठी धोकादायक

या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा आयोगाने आपल्या अहवालात बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम मोठय़ा प्रमाणावरचे सोहळे घेण्यासाठी अयोग्य आणि असुरक्षित’’ असल्याचे निष्कर्ष दिले आहेत.