सामना प्रतिनिधी, मुंबई
शासकीय विधी महाविद्यालयाने तिसऱया वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला होता. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी युवासेनेने केली होती. अखेर शनिवारी झालेल्या विद्यापीठाच्या ‘बोर्ड ऑफ स्टडीज’ने विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थ्यांची लवकरच पुनर्परीक्षा होणार असून सुमारे 270 विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिल्याने विद्यार्थी चिंतेत होते. याबाबत युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी महाविद्यालय प्रशासनास धारेवर धरले होते. सिनेट सदस्यांनी हा मुद्दा विद्यापीठाकडे उपस्थित करत याबाबत तातडीने विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत विद्यापीठाने शनिवारी तातडीने बैठक घेत महाविद्यालयास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शनिवारी सकाळी युवासेनेचे सिनेट सदस्य साईनाथ दुर्गे, अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे, वैभव थोरात आदींनी कुलगुरूंची भेट घेऊन याबाबत तातडीने आदेश देण्याची मागणी केली. यानंतर परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून परीक्षा घेण्याबाबत बोर्ड ऑफ स्टेडीजने घेतलेला निर्णय कळवून त्यावर अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.


























































