
खारघर येथील सेंट्रल पार्कजवळचा भूखंड तब्बल 5 लाख 6 हजार रुपये चौरस मीटर दाराने विकला गेला आहे. 41 हजार 994 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या भूखंडाच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत दोन हजार 200 कोटी रुपये जमा झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर शहरात रियल इस्टेटचे जोरदार टेकऑफ सुरू झाले असून खारघरमध्ये एका चौरस फुटाचा भाव 50 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. भूखंडाच्या दरात मोठी वाढ झाल्याने नवी मुंबईत घरांच्या किमती आता गगनाला भिडणार आहेत.
खारघर येथील सेक्टर 23 मध्ये असलेला 41 हजार 994 चौरस मीटरच्या भूखंडाची विक्री करण्यासाठी सिडकोने निविदा मागवल्या होत्या. हा भूखंड सेंट्रल पार्क आणि नियोजित आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्कच्या जवळ असल्याने या व्यवहाराकडे संपूर्ण रियल इस्टेट वर्तुळाचे लक्ष लागले होते. भूखंडाचे महत्त्व लक्षात घेऊन सिडकोने निविदेमध्ये मूळ दर 3 लाख 51 हजार चौरस मीटर इतका नमूद केला होता. या भूखंडाला चार लाख रुपये चौरस मीटर असा दर मिळेल अशी अपेक्षा सिडको प्रशासनाला होती. मात्र प्रत्यक्षात या भूखंडासाठी आकार अॅस्ट्रोम या कंपनी ई ऑक्शनमध्ये चौरस मीटरला 5 लाख 6 हजार रुपयांचा दर कोट केला. हा दर सर्वाधिक असल्याने भूखंड या कंपनीला मिळाला आहे.
- खारघरमधील भूखंडाच्या व्यवहारातून सिडकोला सुमारे 2 हजार 200 कोटी रुपयांचे लक्ष्मी दर्शन झाले आहे.
- भूखंडासाठी सिडकोने दीड एफएसआय मंजूर केला आहे. भूखंडाचा विकास निवासी आणि वाणिज्य वापरासाठी करण्याची अट टाकण्यात आली आहे. एका चौरस फुटाचा दर थेट 50 हजार रुपयांपर्यंत गेल्याने या भूखंडावर तयार होणाऱ्या घरांच्या किमतीचेही मोठे टेकऑफ होणार आहे.
- सप्टेंबर महिन्यात खारघर येथील सेक्टर 6 मधील 3 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाला 7 लाख 35 हजार रुपये चौरस मीटर इतका दर मिळाला होता. त्यानंतर दोनच महिन्यात विक्री झालेल्या सेंट्रल पार्कजवळच्या या भूखंडाला 5 लाख 6 हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
आठ कंपन्यांचे टेंडर
खारघरमधील हा भूखंड विक्रीची जाहिरात सिडकोने काढल्यानंतर आठ कंपन्यांनी भूखंड घेण्यासाठी टेंडर भरले होते. नोबल ऑरगॅनिक्स या कंपनीने 5 लाख 5 हजारांचा दर कोट केला होता. लोढा डेव्हलपर्सने 5 लाख रुपयांची बोली लावली होती. फॉल्लोन लॅण्डने 4 लाख 14 हजारांवर आपले बिड क्लोज केले होते. पालनहार होम्स, वैलासपाली प्रॉपर्टी, गोदरेज प्रॉपर्टी आणि किशेल्टर या कंपन्यांनी 3 लाख 66 हजार ते 3 लाख 61 हजारांचा दर कोट केला होता. ई अॅक्शनमध्ये सर्वाधिक दर कोट करणाऱ्या आकार अॅस्ट्रोमला हा भूखंड मिळाला आहे.































































