धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटामागे ‘हे’ आहे कारण, मित्रानेच केला खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य अभिनेता धनुष हा त्याची पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त झाला आहे. लग्नाच्या 18 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रेक्षक आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही बाब धक्कादायक असली तरी त्यांच्या जवळच्या मित्रांना मात्र याचं काहीही आश्चर्य वाटलं नाही.

धनुष आणि ऐश्वर्यात नेमकं काय बिनसलं, म्हणून त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. धनुषच्या एका जवळच्या मित्राने माध्यमांजवळ याचा खुलासा करत कारण सांगितलं आहे.

घटस्फोटमागे धनुषचं वर्कोहोलिक असणं हे कारण असल्याचं त्याचं म्हणणं आहे. धनुष हा नेहमी कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत असतो. तो कशाच्याही आधी आपल्या कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या कामाच्या ताणाची भरपाई त्याच्या कुटुंबाला करावी लागते. आधी देखील त्या दोघांमध्ये जेव्हा वाद होत असत तेव्हा तो नवीन चित्रपट साईन करत असायचा.

अशा प्रकारे तो स्वतःला व्यग्र ठेवून या तणावापासून अलिप्त राहायचा प्रयत्न करत असे. धनुषला स्वतःच्या आयुष्याबद्दल चर्चा केलेली आवडत नव्हते. त्यामुळे जवळच्या मित्रांसोबत देखील तो कधी फारसं बोलत नसे. त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे जेव्हा ऐश्वर्यासोबत वाद होत, तेव्हा नवीन चित्रपटात काम करणं हा त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग असायचा. एका पराभूत नात्यातून बाहेर पडण्यासाठी धनुष कामाचा आसरा शोधत होता, असं या मित्राचं म्हणणं आहे. गेल्या अनेक काळापासून धनुष आणि ऐश्वर्या यांनी एक जोडपं म्हणून वेळ व्यतित न करता वैयक्तिक स्पेसला महत्त्व दिलं. त्यामुळे त्यांच्या नात्यावर त्याचा परिणाम झाल्याचं या मित्राचं मत आहे.

धनुषच्या या निर्णयांचा त्याच्या कुटुंबावर गंभीर परिणाम झाला. गेले सहा महिने धनुष आणि ऐश्वर्या यांना खूप कष्टदायक काळातून घालवावे लागले. कारण, धनुष त्याच्या अतरंगी रे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. आपल्या कोणत्याही खासगी गोष्टीचा परिणाम त्याला चित्रपटावर होऊ द्यायचा नव्हता. दुसरीकडे ऐश्वर्या देखील स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये व्यग्र ठेवत होती.

आता त्यांची मुलं देखील मोठी झाली आहेत. त्यांना आई वडिलांच्या विभक्त होण्याविषयी योग्य पद्धतीने कळू देणं त्या दोघांनाही महत्त्वाचं वाटत होतं. त्या दोघांचाही सहपालकत्वावर विश्वास आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात ते विभक्त असले तरी पालक म्हणून मुलांसाठी ते एकत्र दिसू शकतात, अशी अपेक्षाही या मित्राने व्यक्त केली आहे.