
नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी दाखल 1 हजार 395 पैकी 666 अर्ज मागे घेतल्याने निवडणूक मैदानात 729 उमेदवार आहेत. आज अंतिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना चिन्हांचे वाटप पार पडले. प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारीदेखील बंडखोरी शमवण्यात भाजपला पुरते यश आलेच नाही. माजी नगरसेवक रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, सतीश सोनवणे, शशिकांत जाधव यांनी अपक्ष म्हणून बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे त्या-त्या प्रभागात भाजपचा पराभव निश्चित मानला जात आहे.
महापालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांकरिता 1 हजार 395 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 666 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. सर्वाधिक 14 माघारी प्रभाग 10 (अ) मधून झाल्या आहेत. आता एकूण 729 उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावून पाहणार आहेत.
प्रभाग 29 मधून दीपक बडगुजरविरोधात अर्ज बाद झालेले भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तिकीट न मिळाल्याने भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर हे प्रभाग 2 मध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र माजी नगरसेवक मच्छिंद्र सानपांना टक्कर देतील. याचप्रकारे प्रभाग 30 मधून अजिंक्य साने यांच्याविरुद्ध सतीश सोनवणे आणि प्रभाग 10 मधून विश्वास नागरे विरुद्ध शशिकांत जाधवांनी आव्हान दिले आहे.
मालेगावातही भाजपमध्ये बंडाळी
मालेगाव महापालिकेच्या 21 प्रभागांमधील 84 पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 83 जागांसाठी 307 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नाशिकपाठोपाठ मालेगाव येथेही भाजपच्या दोघांनी बंडाचे निशाण फडकवून उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. मालेगाव येथेही महायुती झालेली नाही. भाजपला येथेही पक्षांतर्गत बंड शमवण्यात पूर्णतः यश आले नाही. भाजप व्यापारी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नितीन पोफळे यांनी प्रभाग 10 मधून, तर माजी नगरसेविका दीपाली वारुळे या प्रभाग 9 मधून अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिल्या आहेत. काहींनी माघारी घेतल्या आहेत.
83 जागांकरिता 307 उमेदवार रिंगणात
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी एकूण 806 जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत 94 बाद होऊन 526 उमेदवारांचे 714 अर्ज वैध ठरले होते. एक महिला उमेदवार बिनविरोध झाल्या असल्याने उरलेल्या 83 जागांसाठी आता 307 जण निवडणूक मैदानात आहेत.



























































