
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात पुन्हा संघटनात्मक पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा व कराड येथे शिवसैनिकांच्या दोन मॅरेथॉन बैठका पार पडल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना चांगला धडा शिकवण्याचा निर्धार त्यामध्ये करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुन्हा कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सातारा व कराडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ही बैठक शिवसेना नेते, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिवाकर रावते व शिवसेना उपनेते, सातारा-सांगली संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली. यावेळी कराड तालुकाप्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे, तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक अनिता जाधव आदी उपस्थित होते.
येत्या दोन महिन्यांमध्ये सातारा जिल्हा काही ग्रामपंचायती, नऊ स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यामुळे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सर्व शाखाप्रमुखांना शाखा रचना आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय सातारा नगरपालिकेमध्ये स्वतंत्र पॅनेल कसे उतरवता येईल, याचीही रणनीती ठरविली जाणार आहे. दिवाकर रावते यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या शाखांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी आणि शिवसेनेने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांची यादी जनतेपर्यंत पोहोचवणे या कामांच्या सूचना दिल्या आहेत. नितीन बानुगडे-पाटील लवकरच साताऱयात बैठक घेणार असून, सर्व जिल्हाप्रमुखांना या बैठकीसाठी आमंत्रित केले जाणार आहे.
जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे देतील तो आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असेल, आगामी काळामध्ये कोणत्याही स्वरूपाचे आव्हान झेलण्यासाठी सज्ज असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी सांगितले.






























































