अंडे का फंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मीना आंबेरकर

थंडीत अंडी जरा महाग असली तरी त्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची मौज न्यारीच!

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. आहारात अंडय़ाला फार महत्त्व आहे. कारण त्यात पोषक घटक पुष्कळ प्रकारचे असतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे प्रथम दर्जाची प्रथिने व पुष्कळ प्रमाणात स्निग्धांशाचा समावेश असतो. हे दोन्ही प्रकार पचनास अगदी सोपे असतात. अंडय़ातील पांढऱया बलकामध्ये प्रामुख्याने प्रथिने पाणी आणि रिवोफ्लेव्हिन पुष्कळ प्रमाणात असते. शिवाय सिग्धांश, कॅल्शियम व लोह हेही थोडय़ाफार प्रमाणात असते. अंडय़ाच्या पिवळय़ा बलकाने फॅट सूक्ष्म कणाच्या स्वरूपात असल्याने पचण्यास सोपी असते. यात अ, ब, ड जीवनसत्त्वे असतात. अर्धवट उकडलेले अंडे हे पचनाला सुलभ असते. अंडे दुधाच्या किंवा तृणधान्याच्या पदार्थांबरोबर शिजवल्यास चटकन पचतात. असे हे गुणकारी अंडे सर्वांच्याच परिचयाचे आहे. शाकाहारी लोकही अंडी त्याज्य मानत नाहीत. अशा या अंडय़ाच्या काही चटपटीत खाद्यकृती आज आपण पाहणार आहोत.

अंड्याची भजी

egg-bhaji-1
साहित्य – उकडलेली सहा अंडी, अर्धा चमचा मिरची पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा, दोन लसूण पाकळय़ा, कोथिंबीर, मीठ, तेल, चिमूटभर सोडा, बेसन.

कृती – कोथिंबीर व लसूण वाटून घ्यावी. बेसनात मीठ, हळद, मिरची पूड व वाटलेली गोल्डी घालून वर एक टे.स्पून कडकडीत तेल घालावे. सर्व पीठ कोरडेच चांगले मिसळून घ्यावे. मग चिमूठभर सोडा घालून पीठ भज्याचं जाडसर करून भिजवावे. अंडी सोलून उभी चिरावी, अर्धी अर्धी कापावीत, पिठात बुडवून बदामी रंगावर तळून काढावी. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावीत.

अंडे पॅटिस
साहित्य – 4 अंडी, एक कांदा बारीक चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड वाटी कणीक, 1 चमचा तेल, पॅटिस तळण्याकरिता तेल किंवा तूप, चवीनुसार मीठ.

कृती – दीड वाटी कणीक, 1 चमचा तेलाचे मोहन व मीठ घालून पॅटिसकरिता घट्ट भिजवावी. अंडी फोडून फेटून घ्यावीत. त्यात कांदा, मिरच्या, मीठ घालून फेटून घ्यावे. कणकेचे सारखे सहा भाग करावेत. त्यांच्या फुलक्याप्रमाणे पातळ गोल पोळय़ा लाटून घ्याव्यात. फ्राईंग पॅनमध्ये चार ते सहा चमचा तूप गरम करावे. एक फुलका पोळपाटावर घ्यावा व त्यावर 2 चमचे अंडय़ाचे मिश्रण मधोमध ठेवावे. फुलक्याची एक बाजू घडी करून मिश्रणावर आणावी. दुसरी बाजू त्या बाजूवर घ्यावी. लांबट आकार तयार होईल उरलेल्या दोन्ही टोकाच्या कडा पटकन मुडपून थोडासा पाण्याचा हात लावून घट्ट बंद करावे व हलक्या हाताने पॅटिस उचलून गरम तुपावर फ्राईंग पॅनमध्ये टाकावा. गॅसची आच मंद ठेवावी. दोन्ही बाजूंना पॅटिस मंद आचेवर गुलाबी रंगावर खरपूस तळावा. अशा तऱ्हेने सर्व पॅटीस करून घ्यावेत. टोमॅटो सॉसबरोबर गरम सर्व्ह करावे.

अंडय़ाचा पराठा

egg-paratha-1
साहित्य – 4 अंडी, एक कांदा बारीक चिरून, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड वाटी कणीक, 1 चमचा तेल, पराठे तळण्याकरिता तेल अथवा तूप, चवीनुसार मीठ.

कृती- दीड वाटी कणीक 1 चमचा तेलाचे मोहन व मीठ घालून पराठय़ाकरिता घट्ट भिजवावी. अंडी फोडून फेटून घ्यावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून फेटून घ्यावे. कणकेचे चार सारखे भाग करावेत. त्यातील एका भागाचा पराठा लाटावा. फ्राईंग पॅन गॅसवर ठेवावे. गरम झाले की लाटलेला पराठा त्यावर टाकावा. पराठा खालच्या बाजूने थोडा शेकला गेला की उतरवावा व कडेने एक चमचा तूप सोडावे. फेटलेल्या अंडय़ाचा पाव भाग पराठय़ावर सारखा पसरावा व लगेच उलटवावा. खालच्या बाजूने अंडे आम्लेटसारखे पराठय़ावर सेट होईल तसे झाले की उलटून दुसऱया बाजूने पराठा शेकवून घ्यावा असे सर्व पराठे करून घ्यावेत. टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

अंडय़ाचे रोल

egg-roll-1
साहित्य – आठ अंडी, तीन-चार कांदे, 1 इंच आले, दोन-तीन हिरव्या मिरच्या, सात-आठ लसूण पाकळय़ा, अर्धा चमचा हळद, पाव कप दही, एक चमचा मेदा, एक चमचा मिरी पूड, पाव किलो खिमा, मीठ, तूप, लोणी.

कृती – खिमा धुवून कोरडा करावा. आले, लसूण, मिरच्या वाटून खिम्याला चोळावे. दही, मीठ हळद एकत्र करून खिम्यात घालावे व खिमा कालवून अर्धा तास ठेवावा. नंतर तूप तापवून त्यात खिमा घालून परतावा. पाच मिनिटे परतून अर्धा कप पाणी घालून मंद गॅसवर मऊ शिजवावा. पाणी असल्यास कोरडा करून घ्यावा. अंडी फोडून पांढरे, पिवळे वेगळे काढून घ्यावे. पांढरे खूप हलके होईपर्यंत बीट करून घ्यावे. मग त्यात मैदा घालून परत बीट करावे. पिवळा भाग घालून सर्व एकजीव करावे. त्यात कांदा बारीक चिरून घालावा. मीठ व मिरी पूड घालावी. नेहमीप्रमाणे फ्राईंग पॅनमध्ये थोडे अंडय़ाचे मिश्रण घालून आम्लेट करावे. आम्लेट तयार झाले की, त्यात मावेल एवढा खिमा घालून आम्लेटचा रोल करावा. हलकाच दाबून घट्ट करावा व डिशमध्ये काढून त्याचे दोन तीन तुकडे करावे व खाण्यास द्यावे.