अननसाचा हलवा

अननसाचा हलवा

साहित्य : 1 किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे, 250 ग्रॅम खवा, एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम, 500 ग्रॅम साखर, 4 मोठे चमचे तूप, पाव चमचा केशर, 1 वाटी पाणी, 2-3 चमचे काजू आणि बदामाचे पातळ काप.

कृती : सर्वप्रथम साखरेत पाणी घालून दोन तारी जाड पाक मंद आचेवर तयार करावा. पाक तयार झाला की, त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे. मंद आचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे. नंतर गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. अननस शिजत आला की, पाकही आळतो आणि मिश्रण घट्ट होऊ लागते. केशर वापरायचे असल्यास त्यात घालावे. दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की, अननसाचे मिश्रण घालून परतावे. खवा त्यातच कुस्करून घालावा आणि मिसळेपर्यंत सतत ढवळावे. 3-4 मिनिटे ढवळून खाली उतरवावे. कोमट होऊ द्यावे. त्यानंतर पुडिंग बाऊलमध्ये घालून त्यावर साय आणि काजू बदामाचे काप घालावेत. समारंभासाठी हलवा करायचा असल्यास साय किंवा क्रीमऐवजी त्याच्याबरोबर व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती आणि स्वादानुसार आईस्क्रिम द्यावे. हा हलवा दोन-तीन दिवस आधी करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला आणि रसाळ हवा. हा हलवा मोठय़ा समारंभासाठीही करता येतो.