
सामना ऑनलाईन, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही समुद्रातील बेटांवर वसली असून ही बेटे एकमेकांना जोडण्यासाठी यापूर्वी समुद्रात भराव टाकण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. अनेक दशकांपूर्वी हायकोर्टपासून मरीन ड्राइव्हपर्यंत भराव टाकण्यात आल्यानेच हा किनारपट्टीचा भाग एकमेकांशी जोडला गेला. या रिक्लेमेशन (भराव)मुळे पर्यावरणाचे नुकसान झाले नाही आताही कोस्टल रोडच्या कामामुळे सागरी जैव विविधतेची कायमस्वरूपी हानी होईल याची शक्यता कमीच आहे. म्हणूनच कोस्टल रोडला विरोध करणे निरर्थक असल्याचा युक्तिवाद मुंबई महापालिकेच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आला.
मुंबईकरांच्या सोयीसाठी महापालिका तसेच राज्य सरकारच्या वतीने पश्चिम किनारपट्टीवर कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. असे असतानाही कोस्टल रोडच्या कामामुळे मच्छिमारांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून पालिका तसेच राज्य सरकारने पर्यावरणविषयक परवानग्या घेतल्या नाहीत, असा आरोप करीत वरळी कोळीवाडा नाखवा आणि वरळी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील ऍड. दरायुस खंबाटा यांनी बाजू मांडली व कोस्टल रोडचे महत्त्व त्यांनी न्यायमूर्तींना पटवून दिले.
जनसुनावणी आवश्यक नाही
हे काम सुरू करण्यापूर्वी स्थानिक लोकांचे मत विचारात घेण्यासाठी जनसुनावणी का घेतली गेली नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला. त्यावेळी पालिकेने युक्तिवाद करताना सांगितले की, इन्व्हायरोमेन्ट इम्पॅक्ट असेसमेंट कमिटीने जो अहवाल दिला होता त्या अहवालाचा विचार करता कोस्टल रोडच्या कामापूर्वी जनसुनावणी घेण्याची आवश्यकता नाही म्हणूनच जनसुनावणी घेण्यात आली नाही.



























































