
सामना प्रतिनिधी । भोकर
मोबाईल क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘रेड मी’ कंपनीचा मोबाईल चालू करताच मोठ्या प्रमाणावर धुर निघून जागेवर जळाल्याची घटना भोकर शहरात घडली असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. वॉरंटी असताना कंपनीने मात्र हातवर केल्याने ग्राहकाने ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
भोकर शहरातील विश्वकर्मा नगरातील रहिवासी प्रा.मिरा जोशी यांनी दि. ३ फेब्रुवारी २०१८ ला वसमत येथील राईट चॉईस मोबाईल शॉपी, ठक्कर बाजार येथून रेड मी वाय १, मॉडेलचा बॅटरी इनबिल्ट असलेला मोबाईल ९७००/- रु. खरेदी केला. मोबाईल त्याच्या मोठ्या मुलीने चालू करताच मोबाईल मधून धूर येण्यास सुरुवात झाल्याने एकच गोंधळ उडाला. मोबाईचा स्फोट होतो की काय या भीतीने घरातल्या सदस्यांसह शेजाऱ्यापैकी कोणीही मोबाईलला हात लावण्यास घाबरत होते. शेवटी सर्वांसमक्ष एखाद्या रसायनाप्रमाणे मोबाईल खदखदत जागेवर जळून शांत झाला. त्याची तीव्रता एवढी होती की फरशीवर सुध्दा मोठा काळा डाग पडला. सुदैवाने सदर प्रकार मोबाईल घरात असताना झाला अन्यथा प्रवासा दरम्यान पर्समध्ये किंवा हातात असताना घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
या प्रकाराबाबत मोबाईलची वॉरंटी असल्याने दुकानदाराशी संपर्क केला असता नांदेड येथील कंपनीच्या केअर सेंटरकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार केअर सेंटरला भेट दिली असता सुरुवातीला कंपनीला कळवून मार्ग काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे वेळोवेळी भेट घेतली असता मात्र बर्न केस आम्ही घेत नाहीत, तुम्ही कंपनीशी डायरेक्ट संपर्क करा असे सांगत टाळण्यास व उध्दट वर्तणूक देण्यात आली. कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता मोबाईलमधील बॅटरी उघडण्याचा प्रयत्न केला गेल्याने हा प्रकार घडल्याचे कारण सांगून हात वर करण्यात आले. झालेल्या प्रकाराबद्दल सहानुभूती किंवा दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी चुकीचे खापर ग्राहकांच्या माथी मारण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल खरेदी करतानाच मोबाईल मॉडल इनबिल्ट बॅटरी असल्याचे आम्हाला माहिती होते. असे असताना आणि बॅटरी काढण्याचा आरोप हा सरळ सरळ कंपनीकडून फसवणूक करण्याचा असल्याने प्रा. मिरा जोशी आता ग्राहक मंचाकडे दाद मागणार आहेत.
































































