अभ्युदय नगर, कामाठीपुराचा पुनर्विकास लांबणीवर

अभ्युदय नगर आणि कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासासाठी ‘बांधकाम व विकास’ या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र विकासकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे अभ्युदय नगरच्या पुनर्विकास निविदेला 14 ऑगस्टपर्यंत तर कामाठीपुराच्या निविदेला 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अभ्युदय नगरला सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फूट आकारमानाची 3410 घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासाची म्हाडाने सुरुवातीला गेल्या वर्षी ऑक्टोबरला निविदा काढली होती. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घराचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, अशी अट म्हाडाने घातली होती. सहा वेळा मुदतवाढ देऊनदेखील एकाही विकासकाने निविदा न भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडाने पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 635 वरून 620 पर्यंत कमी करत विकासक नेमण्यासाठी नव्याने निविदा मागवल्या होत्या.

दुसरीकडे, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत कामाठीपुराचा समूह पुनर्विकास करण्यात येणार असून एजन्सी नियुक्त करण्यासाठी 12 जून रोजी निविदा जाहीर करण्यात आली होती. पुनर्विकासातून येथील 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटाचे हक्काचे घर मिळणार आहे.

अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी झालेल्या निविदा पूर्व तांत्रिक बैठकीत कल्पतरू, रुस्तमजी आणि महिंद्रा लाईफ स्पेस या तीन पंपन्यांनी तर कामाठीपुराचा पुनर्विकासासाठी झालेल्या निविदा पूर्व तांत्रिक बैठकीत रेमंड रियालिटी आणि अशदान प्रॉपर्टीज प्रा. लि. या पंपन्यांनी हजेरी लावली होती.