
राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी विशेष नियोजन करा असे निर्देश आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांना पुरवल्या जाणार्या विजेचे दरही जास्त आहेत. त्यामुळे ते कमी करण्याबाबत ठोस उपाययोजना करा असेही त्यांनी बजावले आहे.
उद्योगांना पुरवल्या जाणाऱया विजेच्या दराचा विचार करता इतर राज्यांच्या तुलनेत प्रतियुनिटमागे एक रुपयांनी जास्त आहेत. त्याचा थेट परिणाम उद्योगांच्या वाढीवर होत असल्याचे सांगत ते कमी करणे आवश्यक असल्याचे नितीन राऊत यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान भविष्यात विजेची मागणी वाढणार असून स्वस्त विजेची खरेदी करण्यासाठी नियोजन करावे असेही राऊत यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱयांना दिवसा आठ तास वीज पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करा
नवीन कृषी धोरणात शेतकर्यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचे अश्वासन दिले आहे. मात्र सध्या कृषीवीज वाहिन्या अतिभारीत होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. त्याची दखल घेत वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे, रोहित्रांची संख्या व क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे. तसेच जी रोहित्र दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्यास सक्षम नाहीत त्यांचा शोध घेऊन सक्षमीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा असेही निर्देश ऊर्जमंत्र्यांनी दिले आहेत.




























































