
यशस्विनी ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील 6 आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी 2 आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला तर बोठे याच्या वतीने मुद्देमाल परत मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात आरोप सिद्ध करण्यासाठी पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी ठेवण्याचे आदेश येथील जिल्हा न्यायाधीश सुनील एस. गोसावी यांनी दिले आहेत.
आरोपींमध्ये सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके, फिरोज शेख, गुड्डू शिंदे, ऋषिकेश पवार, बाळ बोठे यांचा समावेश असून यांना न्यायालयात हजर केले. रेखा जरे यांचा नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटामध्ये धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. 30 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला नगर पोलिसांनी सागर भिंगारदिवे व फिरोज शेख यांना दोन वेगळ्या ठिकाणाहून अटक केली होते. या षड्यंत्राचा मास्टर माइंड व मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. जरे या पुण्याहून नगर येथे येत असताना त्यांचा गाडीचा पाठलाग करून त्यांना जीवे ठार मारले होते. ज्याला सुपारी दिली होती, त्याचा फोटो सुद्धा त्याच दिवशी व्हायरल झालेला होता. या प्रकरण संदर्भात पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाबरोबरच विशेष असे चार पथके तपासासाठी पाठवण्यात आले होते. आरोपीचा शोध मात्र लागायला तयार नव्हता. या घटनेच्या मास्टर माइंड बाळ बोठे असल्याने पोलिसांनी त्यावेळी त्याचा मोबाईल हस्तगत केला होता. व तो त्या तपासासाठी पाठवण्यात आलेला आहे. बोठे याने भिंगारदिवे व त्याच्या साथीदारांना पैसे देऊन खून केल्याचे तपासात पुढे आले होते. तीन महिने झाले तरीही या आरोपीचा शोध लागत नव्हता. म्हणून पोलिसांनी बाळ बोठे याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू करून तो फरार असल्याची जाहीर केले होते व तपास सुरु ठेवला होता. बाळ बोठे याचा मित्र तनपुरे याच्याशी बोठे संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी हैदराबाद येथून बोठेला व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर याच्यासह आरोपींना सुरुवातीला पोलीस कोठडीनंतर न्यायालायीन कोठडी दिली होती. या घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांनी केला होता.
या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक झाल्यानंतर न्यायालायामध्ये आज त्यांची ओळख परेड घेण्यात आली. आरोपी सागर भिंगारदिवे व आदित्य चोळके यांनी अर्ज दाखल केले होते. आरोपी चोळके याचे वकील सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्याचा अर्ज खारीज करावा असा विषय पुढे आला आहे. तर सागर भिंगारदिवे याची पत्नी आजारी असल्याचे कारण देत जामीन अर्ज दाखल केला. आरोपी बाळ बोठे याची पत्नी सविता बोठे यांनी न्यायालयामध्ये जप्त केलेला मोबाईल व दुचाकी परत मिळावी असा अर्ज दाखल केला; तर जी कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत, ती मिळावी यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
रेखा जरे यांच्या वतीने त्यांचे वकील सचिन पाटेकर यांनी आज न्यायालयामध्ये बाजू मांडताना घडलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे आरोपी बोठे यांच्या वतीने जो अर्ज दाखल केलेला आहे. त्यातील कोणत्याही वस्तू देण्यात येऊ नये. कारण घटना घडताना बोठे कोणाकोणाच्या संपर्कात होते, हे त्यामध्ये आहे. तसेच गुन्ह्यामध्ये गाडी सुद्धा वापरण्यात आली आहे. तसेच बोठे याचे त्याच्या मुलाशी अनेकवेळा संभाषण झालेले आहे. त्यामुळे जरी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल झालेले असले तरी त्या वस्तू देण्यात येऊ नये व कागदपत्रे दिली तर त्या कागदपत्राचा दुरुपयोग होऊ शकतो असा आक्षेप घेत त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही म्हणणे ऐकल्यानंतर पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


























































