पाच आरोपींविरोधात दोन दिवसांत पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांड प्रकरणाला तीन महिने होत आले आहेत. न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली असून, साधारणतः एक हजार पानांचे पहिले दोषारोपपत्र राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. येत्या दोन दिवसांमध्ये हे दोषारोपपत्र पारनेर येथील न्यायालयामध्ये दाखल केले जाणार आहे.

आरोपींमध्ये पत्रकार बाळ ज. बोठे याच्यासह सागर उत्तम भिंगारदिवे (रा. शास्त्रीनगर, केडगाव), ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार (रा. प्रवरानगर, ता. राहाता), फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर आंबी, ता. राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. कडीत फत्तेबाद, ता. श्रीरामपूर), आदित्य सुधाकर चोळके (रा. तिसगाव फाटा, कोल्हार, ता. राहाता) यांचा समावेश आहे. पत्रकार बोठे वगळता इतर आरोपींच्या विरोधात पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. बोठे पोलिसांना सापडल्यानंतर त्याच्याविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे फरारी आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत. अटक केलेल्या पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. पोलिसांनी या घटनेत 30 ते 40 जणांचे जबाब नोंदवलेले आहेत तसेच 50हून अधिक जणांची प्राथमिक चौकशी केली आहे. तसेच, पोलिसांनी बोठेच्या घरावर दोन वेळा छापा टाकला होता तसेच बोठे याचा फोनसुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

अटकेत असलेल्या पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलिसांनी एक महिन्यापासून सुरू केली होती. अनेकांच्या जबाबासह घटना कशी घडली? या घटनेमागे कोण कोण आहे? यामध्ये कोण कोणाचा कसा सहभाग आहे? असा सर्व उल्लेख दोषारोपपत्रामध्ये येण्याची शक्यता आहे. साधारणतः एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार झाले असून, येत्या दोन दिवसांमध्ये ते पारनेर न्यायालयामध्ये सादर केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.