ताणतणाव दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून बहुतांश लोकांच्या मानसिक त्रासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही जणांना नोकरीची चिंता, कुणाला कोरोनाची लागण होण्याची चिंता, काहींना घर-ऑफीसच्या कामात अडकल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्यांना समस्यांना सतत सामोरे जावे लागते. जर तुम्ही ताणतणाव, चिंता, नैराश्य यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर औषधांऐवजी नैसर्गिक वनस्पतींचा वापर केल्यानेही त्यापासून मुक्त होऊ शकता. त्यामुळे आयुर्वेद सल्लागार नैसर्गिक वनस्पतींचा वापर करण्याचा सल्ला देतात. औषधांच्या सेवनामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते, मात्र नैसर्गिक वनस्पतींमुळे आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. पाहूया अशा 4 आयुर्वेदिक वनस्पतींविषयी ज्या तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी मदत करू शकतात, मात्र ही औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे.

शंखपुष्पी
शंखपुष्पी हे औषध मज्जासंस्थेला चालना देते. याच्या सेवनाने पोट साफ होते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. शंखपुष्पीला ब्रेन टॉनिक म्हणतात. मज्जासंस्थेला पुनरुज्जीवित करत असल्याने याला आयुर्वेदात लावणी असे म्हणतात. ताणतणावामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी शंखपुष्पीचे सेवन केल तर केसगळती नियंत्रणात राहते.

जटामासी
हे औषध तणावामुळे होणारी झोपेची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. जटामासी गोळी किंवा पावडर स्वरुपात मिळते. यामुळे मेंदुचे कार्य सुरळीत राहते. मेंदुच्या पेशींना झालेले नुकसान भरून काढते. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे चिंता, निद्रानाश दूर करून मन शांत राहते.

अश्वगंधा
अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी अश्वगंधा हे औषध वापरले जाते. हे एक उत्कृष्ट आयुर्वेदिक औषध असून रोगांवर उपचार करण्यासाठी याची मुळे जास्त प्रमाणात वापरली जातात. या मुळांना ‘अश्वगंधा मूळ’ म्हणतात. अश्वगंधाची मुळे पावडर स्वरूपात घेता येतात. दुधात घालून त्याचे सेवन करता येते. यामुळे रक्तदाब कमी होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. मेंदू आणि चेतापेशींमधील जळजळ दूर होते. तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी ही एक चांगली औषधी वनस्पती मानली जाते. यामुळे ळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकून राहते. सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, स्नायू दुखणे अशा त्रासांवर अश्वगंधा घेतले जाते. यामुळे मेंदुतील रक्ताभिसरणही सुधारते.

ब्राह्मी
तणाव, चिंता, अल्झायमर यासारख्या अनेक आजारांवर ब्राह्मी गुणकारी आहे. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. ताणतणावाशी लढण्यासाठी मदत होते. ब्राह्मीचे सेवन तज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. बाजारात ब्राह्मीच्या गोळ्या, सरबत, घृत, पावडर या स्वरूपात उपलब्ध आहे. काहींना चिंतेमुळे जास्त पित्ताचा त्रास होतो, अशावेळी ब्राह्मी तुपाच्या रूपात घेता येते.

समस्या आणि प्रकृतीचे विश्लेषण केल्यानंतर, तुम्ही कोणते औषध कोणत्या स्वरूपात सेवन करू शकता, हा सल्ला आयुर्वेदिक सल्लागार डॉक्टर सांगतात.