भाजपने फसवलं  तरीही महायुतीत राहणार – महादेव जानकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mahadev-jankar

भाजपने मला फसवलं, माझ्या पक्षाला धोका दिला आहे. मात्र तरीही 288 जागांवर मी महायुतीलाच मदत करणार आहे. सध्या बाहेर पडणे बरोबर दिसणार नाही. त्यामुळे निवडणूक महायुतीचे घटकपक्ष म्हणूनच लढवणार आहोत, अशी असाहयताच रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

विधान परिषद निवडणुकीवेळी रासपच्याच नावावर आमदार होण्याचा खाक्या दाखवणार्‍या जानकर यांनी आज पुन्हा एकदा आपला खाक्या दाखवला. आम्हाला महायुतीने दोन जागा सोडल्या, आम्हाला आमच्या चिन्हावर लढू देण्याचं भाजपने मान्यही केलं. पण एबी फॉर्मच देण्यात आला नाही. भाजपने आमच्यासोबत धोका केला, असे जानकर म्हणाले.

राहुल कूल आणि मेघना बोर्डीकर आमचे उमेदवार नाहीत

भाजपकडून दौंड आणि जिंतूर या दोन जागा रासपला सोडण्यात येणार होत्या. मात्र रासपला या ठिकाणी उमेदवार न देताच आमदार राहुल कुल यांना दौंडमधून तर मेघना बोर्डीकर यांना जिंतूरमधून भाजपने उमेदवारी दिली. रासपचे उमेदवारांना भाजपच्या तिकिटीवर उभे केल्याने संतप्त जानकरांनी हे आमचे उमेदवार नाहीत. यांना मी पक्षातून बेदखल करतो, असे आज जाहीर केले. दरम्यान, गंगाखेड येथे रत्नाकर गुट्टे हे आमचे अधिकृत उमेदवार असल्याचेही ते म्हणाले.