
सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क
हिंदुस्थानमध्ये इव्हीएमच्या (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) विश्वासार्हतेवर रणकंदन सुरू आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु निवडणूक आयोगाने इव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे म्हटले होते. तसेच इव्हीएम हॅक करून दाखवा असे आव्हानही दिले होते. परंतु अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी आली आहे. यामुळे इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन गदारोळ माजण्याची शक्यता आहे.
अमेरिकेची इव्हीएम निर्माता कंपनी इलेक्शन सिस्टम अँड सॉफ्टवेअरने (ईएस अँड एस) त्यांच्याद्वारे विकण्यात आलेल्या काही वोटिंग मशीनमध्ये रिमोट टूल इन्स्टॉल करण्यात आल्याची कबुली दिली आहे. ईएस अँड एस ही वोटिंग मशीन बनवणारी जगभरातील नावाजलेली कंपनी आहे. अमेरिकी सेनेटर रॉन वाईडेन यांना कंपनीद्वारे पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, २००० ते २००६ मध्ये स्थानिक सरकारला हँडफूल मशीन विकण्यात आल्या होत्या. कंपनीद्वारे सहा वर्ष पाठवण्यात आलेल्या या वोटिंग मशीनमध्ये रिमोट अॅक्सेस सॉफ्टवेअर बसवण्यात आले होते असे कंपनीने आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. मदरबोर्ड या वेब पोर्टलकडे या पत्राची एक कॉपी असून यामुळे इव्हीएमच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या अमेरिकेमध्ये इव्हीएममध्ये रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर बसवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हिंदुस्थानमध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे रिमोट कंट्रोल सॉफ्टवेअर वोटिंग मशीमध्ये बसवण्यात आलेले नव्हते तर इलेक्शन मॅनेजमेंट सिस्टम टर्मिनलमध्ये लावण्यात आलेले होते. याचा वापर वोटिंग मशीनला नियंत्रीत करण्यातसाठी केला जातो. तसेच PCAnywhere या रिमोट सॉफ्टवेअरचा वापर २००७ मध्येच बंद करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या सॉफ्टवेअरचा हँकिंगशी काहीही घेणे-देणे नाही. परंतु हे सॉफ्टवेअर सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलेटप्रुफ नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. २०१२ मध्ये या PCAnywhere याचा सोर्स कोड चोरण्यात आला होता असे हॅकर्सने स्पष्ट केले होते.


























































