
सोलापूर शहरातील रस्त्याकडेला अनेक दिवस उभी असलेली बेवारस, गंजलेली आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी, अस्वच्छता निर्माण करणारी वाहने हटविण्याची मोहीम महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आली आहेत. याप्रकरणी 487 वाहनमालकांना नोटीस बजावण्यात आली असून, दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये उभी असलेली वाहने या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यानुसार चारचाकी वाहने 102, दुचाकी वाहने 37, तीनचाकी वाहने 39, ट्रक 5, डंपर 1 आणि इतर साहित्य 303, अशा एकूण 487 वाहनमालकांना व साहित्यधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या संदर्भात आधीच वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरण देण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली या कारवाईची सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात रेल्वे स्टेशन रोडवरील ‘लावण्या रंग ट्रॅव्हल्स’चे बेवारस वाहन उचलण्यात आले असून, ते वाहतूक पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्था सुधारेल तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल. रस्ते मोकळे झाल्याने तेथील स्वच्छता करणे सुलभ होणार आहे व एकंदरच शहरवासीय तसेच शहरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रकाशांमध्ये शहर स्वच्छ व सुंदर असल्याबाबत भावना निर्माण होणार आहे. या कारवाईमुळे शासकीय जागेत बेवारस अवस्थेत लावलेल्या वाहनांच्या खासगी मालकांमध्ये जागृतीसह एकप्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेली आपली खासगी वाहने तत्काळ आपल्या मालकीच्या जागेत हलवावीत; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.
अशी होणार कारवाई
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी खासगी वाहन बेकायदेशीररीत्या उभे ठेवणाऱ्यांकर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये वाहन सोडवण्यासाठी दहा हजार रुपये दंड आणि टोईंग खर्च आकारण्यात येईल. एक महिन्याच्या आत वाहन सोडवले नाही, तर ते जप्त करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आगामी काळात या मोहिमेला अधिक गती देण्यात येणार असून, शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा व वसाहती परिसरात ही कारवाई सातत्याने चालवली जाईल.


























































