तुमच्याही तोंडातून येतो दुर्गंध ? या उपायांनी घालवा तोंडाला येणारा वास

तोंडाला वास किंवा दुर्गंध येणे ही एक सामान्य समस्या असून अनेक लोकं त्यामुळे त्रस्त असतात. ही समस्या केवळ लाजिरवाणीच नव्हे तर अनेक वेळा यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात. अनेक वेळा असंही घडतं की तुमच्या तोंडातून येणार्‍या दुर्गंधाबद्दल तुम्हालाच माहीत नसतं, पण लोक तुमच्यापासून दूर जातात. ही अतिशय लाजीरवाणी परिस्थिती असते.अनेक वेळा असं होतं की दिवसातून दोनदा ब्रश करून दात स्वच्छ घासल्यानंतरही आपल्या तोंडातून दुर्गंधी येते. अशा वेळी इतरांशी संवाद साधताना लाज वाटते आणि आत्मविश्वासही कमी होतो. पण कधीकधी केवळ दात घासणं पुरेसं नसतं. कधीकधी तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारण काहीतरी वेगळे असू शकते. म्हणूनच प्रथम ती कारणे समजून घेणे व त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. तोंडातून दुर्गंध येण्याचे नेमके कारण काय आणि त्यावर काय उपाय करता येतील हे जाणून घेऊया.

दातांमधील कीड
तोंडातून दुर्गंध येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे दातांमधील कीड. जेव्हा दोन दातांदरम्यान पोकळी निर्माण होते तेव्हा काहीवेळा दातांमध्ये क्रॅक होतात. अशा वेळेस खाल्लेल्या अन्नाचे बारीक कण बर्‍याचदा त्या पोकळीत अडकतात, जे सहसा ब्रश केल्याने दूर होत नाही. अन्नाचे असे कण जास्त वेळ अडकून राहिल्यास दात किडतात तसेच तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. जर तुमच्या दाताला कीड लागली असेल किंवा दातांमध्ये फट अथवा पोकळी असेल तर वेळोवेळी दात स्वच्छ करत राहा. गरज पडल्यास दंतवैद्यांकडे (dentist) जाऊन दात नीट साफ करून घ्या व दातांमधील फट बुजवा.

हिरड्यांमध्ये समस्या
काहीवेळा हिरड्यांमधील समस्यांमुळेही श्वासाला दुर्गंध येण्याचीही समस्या उद्भवते. हिरड्यांना त्रास होत असेल तर दातांवर प्लाक तयार होतो. प्लाक हा पिवळसर-पांढरा रंगाचा पदार्थ आहे. तो वेळेवर साफ न केल्यास श्वास दुर्गंधीचा त्रास सुरू होतो. यासोबतच हिरड्यांमध्ये जळजळ आणि अस्वस्थता देखील सुरू होते.

खाद्यपदार्थांचा वास
काही खाद्यपदार्थ असे असतात की त्यांच्या सेवनामुळे श्वासाच्या दुर्गंधीची समस्या उद्भवते. यामध्ये कांदा, लसूण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. खरंतर लसूण आणि कांद्यामध्ये असे घटक असतात, जे खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते, जी ब्रश करूनही जात नाही. कांदा किंवा लसणाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता जसे लवंग तोंडात घेतल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होऊ शकते. किंवा तुम्ही बडीशेप खाऊ शकता.

आरोग्य समस्या
अशा अनेक आरोग्य समस्या आहेत, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. यामध्ये लिव्हर फंक्शन, किडनी समस्या, टाईप 2 डायबेटिस यासारख्या समस्यांचा समावेश आहे. याशिवाय, जर तुम्हाला कोरड्या तोंडाची समस्या असेल तर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीची समस्या देखील असू शकते. जेव्हा तोंड कोरडे असते तेव्हा तोंडात कमी लाळ तयार होते. आपले तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी लाळ खूप महत्वाची आहे. लाळेमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो. तोंड कोरडे पडल्यास तोंडात वाईट बॅक्टेरिया तयार होतात, परिणामी श्वासाला आणि तोंडाला दुर्गंध येते.

अशी मिळवा तोंडाच्या दुर्गंधापासून मुक्तता
– दररोज दोनदा दात घासण्याव्यतिरिक्त, नियमितपणे आपल्या दंतवैद्याला भेट द्या आणि आपले दात स्वच्छ करा.
– दातांसोबतच जीभही स्वच्छ करत राहा.
– आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश करा.
– खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरा. दात नीट व नियमितपणे स्वच्छ करा. डेंटल फ्लॉसिंग देखील महत्वाचे आहे. तमच्याही तोंडातून वास किंवा दुर्गंध येत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

बेकिंग पावडर-
जर तुम्ही श्वासाच्या दुर्गंधाच्या समस्येने त्रस्त असाल तर बेकिंग पावडर तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरु शकेल. श्वासाच्या दुर्गंधापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर मिसळा आणि या पाण्याने तोंड धुवा. दिवसातून एकदा असे केल्याने तोंडातून येणार दुर्गंध दूर होईल.

तुरटी-
तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचाही वापर करू शकता. एका ग्लास पाण्यात तुरटी टाका आणि ती चांगली विरघळू द्या. आता साधारण 15 ते 20 मिनिटांनी तुरटी पाण्यातून बाहेर काढा. हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा आणि नंतर रोज सकाळी आणि रात्री ब्रश केल्यानंतर या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. त्यावेळी तुरटीचे पाणी 2 ते 3 मिनिटे तोंडात भरून ठेवा. या उपायामुळे तुम्ही श्वासाला येणारा दुर्गंध बर्‍याच प्रमाणात कमी करू शकता.

बडीशेप
माउथ फ्रेशनर म्हणून वापरण्यात येणारी बडीशेप श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल घटक तोंडातील बॅक्टेरिआ नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे श्वासाला येणारा दुर्गंध वाढवणाऱ्या बॅक्टेरिआपासून आराम मिळतो आणि तोंडाला वासही येत नाही.

दालचिनी
जर तुम्ही तोंडाला अथवा श्वासाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही यासाठी दालचिनीचा चहा पिऊ शकता. रोज सकाळी ब्रश केल्यानंतर दालचिनीचा चहा प्यायल्याने श्वासाचा दुर्गंध दूर होईल. यामध्ये असलेले सिनामिक ॲल्डिहाइड नावाचे घटक दुर्गंध वाढवणारे बॅक्टेरिआ नष्ट करण्यात मदत करतात. हवं असल्यास तुम्ही दालचिनीच्या पाण्याने गुळण्यादेखील करू शकता.

डाळिंबाचे साल
जर तुम्हाला श्वासाला येणाऱ्या दुर्गंधापासून सुटका हवी असेल तर तुम्ही यासाठी डाळिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी डाळिंबाची साले पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी किंवा गुळण्या कराव्यात. असे नियमितपणे केल्याने श्वासाला येणाऱ्या दुर्गंधाची समस्या दूर होईल