
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील आपल्या माहितीपूर्ण आणि भारदस्त समालोचनाने क्रीडा शौकिनांना मंत्रमुग्ध करणारे जेष्ठ क्रीडा समालोचक जसदेव सिंग यांचे प्रदीर्घ आजाराने नवी दिल्लीत निधन झाले. निधानसमयी ते 87 वर्षांचे होते. क्रिकेट, हॉकीसह अनेक खेळांसह गणतंत्रदिन सोहळ्याचे अफलातून समालोचन करणाऱ्या जसदेव सिंग यांनी लाखो श्रोत्यांना आपल्या आवाजाची भुरळ पडली होती. 70 आणि 80 च्या दशकात तर त्यांच्या समालोचनाच्या जादूने करोडो क्रीडा शौकिनांचे कान तृप्त केले होते. केंद्र सरकारने त्यांना 1985 मध्ये पद्मश्री, तर 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविले होते.
6 आशियाई क्रीडा स्पर्धा आणि तेवढ्याच हॉकी विश्वचषक स्पर्धांचे समालोचन जसदेव यांनी केले होते. 1963 पासून सलग 48 वर्षे राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताकदिन सोहळ्याचे थेट समालोचन करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. जसदेव सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. क्रीडा समालोचनातला एक भारदस्त, हवाहवासा वाटणारा आवाज हरपला अशा शब्दात राठोड यांनी जसदेव सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.

























































