
नगर अर्बन मल्टिस्टेट सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द करण्यासंदर्भात दिलेल्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीला बँकेच्या संचालक मंडळाकडून आज उत्तर देण्यात आले आहे. आता, रिझर्व्ह बँकेकडून अर्बन संदर्भात भविष्यात काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दीडशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेत झाडाझडती घेऊन संशयित कर्ज प्रकरणांच्या फायली व फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत.
आर्थिक गर्तेत सापडलेल्या नगर अर्बन बँकेला रिझर्व्ह बँकेने बँकिग परवाना रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. अर्बन बँकेच्या कारभारावर गंभीर ताशेरे ओढत थकीत कर्जवसुली, वाढलेला एनपीए, नियमांचे उल्लंघन, अनियमितता अशा विषयांवर 30 दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. 7 जुलै रोजी बँकेला ही नोटीस आलेली आहे. त्याची मुदत 7 ऑगस्ट रोजी आहे. तत्पूर्वीच बँकेकडून उत्तर देण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने काढलेल्या या नोटिशीमुळे बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दरम्यान, दीडशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अर्बन बँकेत झाडाझडती घेऊन संशयित कर्ज प्रकरणांच्या फायली व फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. वैधानिक लेखापरीक्षकांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. नगर अर्बन बँकेशी संबंधित या गैरव्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार नगर अर्बनच्या या सर्व गैरव्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. त्यासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती केली होती. मागील तीन दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्बन बँकेमध्ये तपासणी मोहीम केली. या तपासणीदरम्यान आक्षेप घेण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांसह इतरही काही कर्ज प्रकरणांच्या संशयित फायली व काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.


























































