
‘तौकते’ चक्रीवादळामुळे समुद्रात अडकलेल्या हिंदुस्थानच्या चार जहाजांमधील 710 पैकी 611 कर्मचाऱयांना नौदलाने आज सायंकाळपर्यंत सुरक्षित बाहेर काढले. मुंबईपासून 175 किलोमीटर दूर ‘पी-305’ या जहाजावर मदतकार्य सुरू आहे. या जहाजावर सर्वाधिक 273 कर्मचारी होते. त्यातील 177 जणांना आज सायंकाळपर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
‘पी-305’ जहाजावरील मदतकार्यात नौदलाची ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘आयएनएस कोच्ची’ ही जहाजे सहभागी आहेत. कुलाब्यापासून 48 सागरी मैलांवर अडकलेल्या ‘गाल कन्स्ट्रक्टर’ या जहाजावर 137 कर्मचारी होते. त्यातील 38 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तिथे मदतकार्यासाठी ‘वॉटर लिली’ ही आपात्कालीन नौका पाठवण्यात आली आहे. तसेच ‘सीजीएस’, ‘सम्राट’ ही जहाजेही मदतकार्यासाठी पोहोचत आहेत, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते मेहुल कर्णिक यांनी दिली.
‘सागर भूषण’ या जहाजावर 101 तर ‘एसएस-3’वर 196 कर्मचारी अडकले आहेत. ही दोन्ही जहाजे पीरपाव बंदरापासून 50 सागरी मैलांवर आहेत. तिथे मदतकार्यासाठी ‘आयएनएस तलवार’ जहाज पाठवण्यात आले आहे. नौदलाचे ‘पी-81’ हे विमान आणि हेलिकॉप्टर्स या मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.
48 तास वादळाशी झुंज; खवळलेल्या समुद्रात भरकटलेल्या बार्जमधून 137 कामगारांची सुटका
‘तौकते’ वादळाच्या तडाख्यानंतर समुद्रात भरकटलेल्या बार्जमधील 137 ओएनजीसी कामगारांनी तब्बल 48 तास महाकाय लाटांशी झुंज दिली. ओएनजीसीजवळून भरकटत पालघरमधील वडराईच्या समुद्रात हे जहाज एका खडकाजवळ अडकल्याचा ‘मेसेज’ मिळताच नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करून दोन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या जहाजावर अडकलेल्या 137 कर्मचाऱयांची सुखरूप सुटका केली.
गेल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बार्जवर दास ऑफशोअर आणि अॅपकॉन कंपनीचे 137 कर्मचारी काम करीत होते. तीन दिवसांत अन्नाचा कणदेखील त्यांना मिळाला नाही. बार्जवर असलेल्या फळांवर त्यांनी भूक भागवली. नांगर टाकूनही बार्ज कोणत्या दिशेने निघाले आहे हे कळत नसल्याने जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला होता. नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस आमच्यासाठी देवदूत बनून आले. दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया कामगार प्रमोद यांनी दिली.































































