
बँकेचे कर्ज थकले की वसुलीसाठी येणारे धमकीचे फोन आणि रिकव्हरी एजंट्सचे उर्मट वर्तन आता लवकरच थांबणार आहे. रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली संदर्भात कडक नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध केला. यानुसार, वसुली एजंटने ग्राहकांशी सभ्य भाषेत बोलणे आणि सर्व कॉल रेकॉर्ड करणे बंधनकारक असणार आहे.
नवी नियम काय आहेत?
एजंटांनी सभ्य, सुसंस्कृत आणि मर्यादित वर्तन राखणे आवश्यक. अपमानास्पद भाषा, धमकीचे संदेश, अयोग्य वेळेला भेटी यावर थेट बंदी. एजंट व त्यांच्या कर्मचाऱयांची पूर्वतपासणी अनिवार्य. कर्जविषयक प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्यास सावधगिरीची अट. ग्राहकांची खासगी माहिती एजंटकडून गैरकामासाठी वापरली जाणार नाही, याची जबाबदारी बँकांना घ्यावी लागेल.
संवेदनशील प्रसंगी वसुली टाळा – घरातील मृत्यू, नैसर्गिक आपत्ती, लग्न समारंभ किंवा सणासुदीच्या काळात वसुलीची कारवाई करू नये, असा स्पष्ट निर्देश मसुद्यात आहेत.
तर बँकांवर होणार कारवाई – बँकांनी एजंटांकडे असलेली ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. माहितीचा गैरवापर झाल्यास बँकांवर कारवाई होऊ शकते.
न्यायप्रवीष्ट प्रकरणांत सावधगिरी – न्यायालयात सुनावणी सुरू असलेली कर्ज प्रकरणे वसुली एजंटकडे सोपविताना बँकांना सावधगिरी बाळगावी लागेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.




























































