
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या लांबपल्ल्यांच्या गाडय़ा सुटणाऱया प्लॅटफॉर्म क्र.18 जवळील मोकळ्या जागेत रेल्वेच्या बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. एखाद्या रेल्वेच्या बोगीत तयार केलेले मुंबईतील हे पहिलेच रेस्टॉरंट आहे. ‘बोगी वोगी’ असे या रेस्टॉरंटचे नाव असून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी आज त्याची पाहणी करीत त्याचे औपचारिक उद्घाटन केले.
रेल्वेच्या रिकाम्या कोचचा वापर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. या कोचमध्ये दहा टेबलसह 40 ग्राहकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आतील इंटेरियर रेल्वे थीमच्या अनुरूप करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांबरोबर इतरांनाही न्याहारी तसेच जेवणाचा आनंद घेता येईल. तसेच येथे मध्य रेल्वेने ‘हेरीटेज गल्ली’ तयार केली असून त्यात रेल्वेचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या जुनी इंजिने आणि डब्यांचे जतन करण्यात आले आहे. त्याचे दर्शन हौशी पर्यटकांना घेता येणार आहे. या रेस्टॉरंटचे कंत्राट वर्षभराचे असून प्रगती पाहून कंत्राट पुढे वाढविण्याचा निर्णय घेता येईल. या हॉटेलमध्ये उत्तर, दक्षिण आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. अशा प्रकारचे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नेरळ, लोणावळा आणि इगतपूरी येथे उघडण्याची मध्य रेल्वेची योजना आहे.























































