
आर्थिक स्थितीचे भान न ठेवता मोठय़ा प्रमाणात कर्जवाटप, भांडवल उभारण्यात अपयश यामुळे लक्ष्मी विलास बँक डबघाईला गेली आहे. केंद्र सरकारने या बँकेवर निर्बंध घातले असून ते पुढील 30 दिवसांसाठी लागू राहणार आहेत. तोपर्यंत खातेदारांना फक्त 25 हजार रुपयांचीच रोकड काढता येणार आहे.
लक्ष्मी विलास बँकेला गेल्या तीन वर्षात मोठा तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्जाचा आकडाही मोठा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने या बँकेवर सायंकाळपासून निर्बंध लागू केले. लक्ष्मी विलास बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. निर्बंधांमुळे खातेदारांना येत्या 17 डिसेंबरपर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. मात्र खातेदारांच्या ठेवींना विमा संरक्षण असल्याने त्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे. याआधी पंजाब महाराष्ट्र बँक आणि येस बँक या बँकांवर असे निर्बंध घालण्यात आले होते.
रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेला डीबीएस बँक इंडिया या कंपनीत विलीन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मूळचा सिंगापूरचा समूह असलेल्या डीबीएसने यासाठी 2500 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकारणामुळे डीबीएस समूहाला हिंदुस्थानात बँकिंग परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.




























































