प्रदूषण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत… भायखळा, माझगावमधील बांधकामांवर निर्बंध कायम, पाहणी करून पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबईत बांधकामातून निघणाऱया धुळीमुळे वायू प्रदूषणात वाढ झाली असून जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत भायखळा, माझगाव या परिसरातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणाऱया बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज भायखळा परिसरातील बांधकाम प्रकल्पांचा पाहणी दौरा करून आढावा घेतला. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पालिकेने सक्त उपाययोजना लागू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या परिसरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट अथवा अतिवाईट श्रेणीत आहे तेथील बांधकामे सरसकटपणे पूर्णतः बंद करण्यात आली आहेत. यामध्ये भायखळा आणि बोरिवली पूर्व यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बांधकामे थांबवल्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रावर काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी भायखळा येथील बांधकाम प्रकल्पांचा आज पाहणी दौरा केला.

  • आयुक्तांनी संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) परिसरातील दोन खासगी इमारत बांधकाम प्रकल्पांना भेट दिली तसेच मुंबई सेंट्रल परिसरात बांधकामाधीन असलेल्या मेट्रो-3 प्रकल्पाची ठिकाणे, माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानानजीक डोंगरबाबा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि बेकरीची पाहणी केली.
  • बाप्टिस्टा उद्यानालगत केंद्र शासनाचे भूविज्ञान मंत्रालयअंतर्गत आणि भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र संस्था (पुणे) आणि पालिका यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘सफर’ हवामान पेंद्राचीदेखील आयक्तांनी पाहणी केली. ई विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश सागर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
  • बांधकामाधीन इमारतीला चोहोबाजूंनी हिरवे कापड/ज्युट/ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त केलेले असावे. बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या राडारोडय़ाची तातडीने विल्हेवाट लावावी. प्रकल्पस्थळी बेवारस वाहने असू नयेत. प्रकल्पांच्या ठिकाणी ये-जा करणाऱया वाहनांची चाके नियमितपणे धुतली जावीत, संबंधित प्रकल्पांमध्येदेखील वायू प्रदूषण मोजणारी व वायू प्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे सक्तीचे आहे.