
पवई येथील आयआयटी मुंबईतील हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना कॅम्पसबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवडय़ांत आयआयटीतील विद्यार्थी आणि शिक्षक असे
20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संस्थेने कडक निर्बंध लागू केले आहेत. तसे व्हॉट्सऍप मेसेजेस सर्वांना पाठवण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर दोन हजार शिक्षक व अन्य कर्मचारी तसेच तीन हजार विद्यार्थी कॅम्पसमध्ये परतले होते. आता त्यांना कॅम्पसबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कॅम्पसबाहेरच्या सलूनमधून पसरतोय कोरोना
आयआयटीच्या कॅम्पसमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ते कोणाच्या संपर्कात आले होते त्याची तपासणी संस्थेच्या पथकाने केली होती. संस्थेबाहेर असलेल्या सलूनमध्ये गेल्याने कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज त्या पथकाने व्यक्त केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून संस्थेबाहेरच्या सलूनमध्ये कुणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयआयटी मुंबईने आपली स्वतःची नियमावलीही बनवली आहे. त्यानुसार कॅम्पसमध्ये परतणाऱया विद्यार्थ्यांना दहा दिवस क्वारंटाइन केले जाते. सोशल डिस्टन्सिंगची विशेष काळजी घेतली जात आहे.





























































