
मंत्रालय तळमजल्यावरील त्रिमूर्ती प्रांगणात लागणाऱ्या विविध साहित्य विक्रीच्या स्टॉल्समुळे होणारी गर्दी, गोंधळ आणि सुरक्षेवर येणारा ताण लक्षात घेऊन सरकारने सामाजिक संस्थांच्या विक्री स्टॉलवर निर्बंध घातले आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार आता सामाजिक संस्थांना विक्रीसाठी तसेच अन्य प्रयोजनासाठी त्रिमूर्ती प्रांगण दिले जाणार नाही.
शासन निर्णयानुसार त्रिमूर्ती प्रांगण शासकीय कार्यक्रमांसाठीच प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतरच त्याला मान्यता दिली जाईल. कोणत्याही विभागाने थेट आरक्षणासाठी पत्रव्यवहार करू नये, असे विभागाने बजावले आहे. शासकीय योजनांच्या आणि धोरणांच्या प्रसिद्धी तसेच प्रचारासाठी केवळ दोन दिवसच त्रिमूर्ती प्रांगण उपलब्ध करून दिले जाईल.
शासकीय उपक्रमांमार्फत तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी केवळ तीन स्टॉल्सना दोन दिवसांसाठी परवानगी दिली जाणार आहे. सामाजिक संस्थांना रक्तदान, वैद्यकीय शिबिरासाठी दोन दिवस प्रांगण दिले जाईल. मात्र सामाजिक संस्थांना कोणत्याही प्रकारच्या विक्री उपक्रमासाठी प्रांगण दिले जाणार नाही. सार्वजनिक बँका आणि एलआयसीमार्फत लोकहिताच्या योजनांच्या प्रसिद्धी, प्रचारासाठी दोन दिवस प्रांगण दिले जाणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनासाठी प्रशासकीय विभागाकडून प्रस्ताव आलेल्या फक्त एक स्टॉल दोन दिवसांसाठी देण्यात येईल.




























































