निर्बंध शिथिल होणार? मुंबईकरांनो, आणखी आठवडाभर कळ सोसा!

मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असला तरी संकट अजून टळलेले नाही. मुंबई ‘एमएमआर’ रिजनची स्थितीही अजून पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे राज्य सरकारसह पालिकेनेही  सावध भूमिका घेतली आहे. परिणामी सर्वांसाठी लोकलसह निर्बंध आणखी शिथिल होण्यासाठी मुंबईकरांना किमान आणखी एक आठवडा तरी कळ सोसावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई आणि ‘एमएमआर’ रिजनच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक होणार असून निर्बंधांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने सर्वांच्याच उरात धडकी भरली होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढलेली  रुग्णसंख्या आता चांगलीच नियंत्रणात आली असून चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेटही कमी होऊन 3.79 टक्क्यांवर आला आहे. तर ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असण्याचे प्रमाण 23.56 टक्के आहे. त्यामुळे दुसऱया लाटेतील निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने ठरवलेल्या पाच निकषांनुसार मुंबई ‘पहिल्या’ टप्प्यात आली आहे. मात्र आगामी तीन आठवडय़ांत संभाव्य ‘तिसरी लाट’ धडकण्याचा धोका आरोग्य तज्ञांनी दिला असल्यामुळे पालिका आणि राज्य शासन सध्या ‘सावधान’ आहे.

म्हणूनच पालिका सावध

कोविड स्थितीची मुंबईची आकडेवारी समाधानकारक असली तरी शहराची भौगोलिक रचना व लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, लोकल सुरू केल्यास अचानक वाढणारी संभाव्य गर्दी, टास्क फोर्स व आरोग्य तज्ञांनी तिसऱया लाटेचा दिलेला इशारा यामुळे सद्यस्थितीत मुंबई ‘पहिल्या गटात’ असली तरी  सध्या ‘गट तीन’चेच निर्बंध कायम राहणार असल्याचे प्रशासनाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे सर्व कार्यालयांना 50 टक्के उपस्थिती, बेस्टमधून उभ्याने प्रवासास बंदी आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच आणि शनिवार-रविवार पूर्ण बंदच राहणार असल्याचे पालिकेने परिपत्रद्वारे स्पष्ट केले आहे. सर्वांसाठी लोकल आणि निर्बंध शिथिल करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी आरोग्य तज्ञांनी तिसऱया लाटेची शक्यता वर्तवल्यामुळे निर्बंध आणि लोकलबाबत टप्प्याटप्प्यानेच निर्णय घ्यावे लागतील. ‘एमएमआर’ रिजनचीही स्थिती लक्षात घ्यावी लागेल. त्यादृष्टीने पालिका प्रशासन प्रत्येक आठवडय़ाला आढावा घेत आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त

आकडेवारी काय सांगते

  • मुंबईत सध्या 14 हजार 751 सक्रिय रुग्ण असून 923 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर 9413 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. 4415 रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
  • मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 726 दिवसांवर पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर 95 टक्के तर रुग्णवाढीचा दर 0.09 टक्के आहे.
आपली प्रतिक्रिया द्या