
पार्किंगमधील दुचाकी बाहेर काढण्याच्या वादातून टोळक्याने बेदम मारहाण करीत सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकांच्या मुलाचा खून केला. ही घटना 26 ते 27 जूनदरम्यान आंबेगाव बुद्रूकमधील साई विश्व सोसायटी परिसरात घडली.
नरेंद्र रघुनाथ खैरे (वय 33, रा. आंबेगाव बु) असे खून केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी युवराज जंबु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी, विष्णु कचरु कदम (रा. नऱ्हे) यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी फिर्याद दिली आहे.
भूमकर चौकातील एका बार समोरच वाहन पार्किंग आहे. त्याठिकाणी 26 जूनला नरेंद्रने दुचाकी पार्क केली होती. आरोपींनीही त्याठिकाणी दुचाकी उभी केली होती. गाडी काढताना आरोपी युवराज, ओंकार, वैभव व मनोज यांनी नरेंद्रसोबत वाद घातला. त्यानंतर त्याच्या पोटात सतत हाताने ठोस मारून गंभीर जखमी केले. त्यावेळी हॉटेलचा वेटर विष्णू कदम याने घटना समोर झालेली असतानाही पोलिसांना माहिती कळविली नाही.
दरम्यान, आरोपींनी नरेंद्र पडल्याचे पाहून त्याच्याजवळील रोकड, मोबाईल आणि पाकीट घेऊन पळ काढला. 27 जूनला सकाळी साई मोटर्स परिसरात मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली. तपासाअंती शवविच्छेदन अहवालात नरेंद्रच्या पोटात जबरी मार लागल्याने खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, त्याला सात ते आठजण मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर खुनाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी हॉटेलच्या वेटरलाही अटक केली आहे.
माजी आयपीएस रघुनाथ खैरे यांचा मुलगा
माजी आयपीएस अधिकारी रघुनाथ खैरे यांचा मुलगा नरेंद्र उच्चशिक्षित होता. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. रघुनाथ खैरे हे राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून पोलीस महानिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. दरम्यान, मुलाच्या खूनाच्या घटनेमुळे खैरे कुटूंबियांना प्रचंड धक्का बसला आहे. आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे याच्या शरीराचे स्प्लीनवर मारहाण केली.
पार्किंगमध्ये गाडी काढण्याच्या वादातून आरोपींनी तरूणाला बेदम मारहाण करीत खून केला. त्यानंतर त्याला उचलून बाजूला ठेवून जवळील मोबाइल, पैशांचे पाकिट चोरून नेले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे



























































