आधी पत्नी-मुलावर गोळ्या झाडल्या, मग रेल्वे रुळावर झोपून संपवली जीवनयात्रा; निवृत्त सैनिकाचं टोकाचं पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे एका निवृत्त सैनिकाने त्याची पत्नी आणि मुलाची बंदूकीने गोळी झाडून हत्या केली. यानंतर त्या सैनिकाने कथोगर-इमलीपूर रेल्वे अंडरपासजवळील रुळावरून येणाऱ्या मालगाडीसमोर झोपून आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतराम पासवान असे त्या निवृत्त सैनिकाचे नाव असून सुनीता वर्मा (पत्नी) तर दीप असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. सोमवारी सकाळी 7.30 च्या सुमारास रेल्वे रुळावर चेतराम पासवान यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यावेळी तपास करत असताना त्यांना तेथे मृतदेहाच्या खिशामध्ये मिळालेलं आधार कार्ड आणि दुचाकीचया कागदपत्रावरून मृताची ओळख पटली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपास अतिवेगाने सुरू केला. यानंतर ते मृत चेतराम याच्या घरी पोहोचले. मात्र तेथे पोहोचताच घरातील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. यावेळी घरात चेतराम याची पत्नी सुनीता आणि मुलगा दीप यांचे मृतदेह पडले होते. तसेच एक डबल बॅरलची बंदूकही पडलेली पोलिसांनी आढळली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र निवृत्त सैनिकानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं यामगचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.