
>> विनायक कुळकर्णी
बरेच ज्येष्ठ नागरिक मुलांना त्रास नको किंवा मुलांच्या करियरमध्ये आपलं लोढणं नको म्हणून स्वतःहून वेगळं राहण्याची सोय करतात. पण अगदीच टिपिकल वृद्धाश्रम नको असतो, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन प्रकारच्या राहणीमानाचे पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. एक म्हणजे स्वतंत्र राहणी (Independent Living) आणि दुसरा म्हणजे सहाय्यभूत राहणी (Assisted Living).
सेवानिवृत्ती पश्चयात बरेच ज्येष्ठ नागरिक आपल्या मुलांना त्रास नको किंवा मुलांच्या करियरमध्ये आपलं लोढणं नको म्हणून स्वतःहून वेगळं राहण्याची सोय करतात. काही वेळा या ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात नोकरी – व्यवसायानिमित्त वास्तव्य करीत असतात किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेली असतात. म्हातारपणातील अडीअडचणीला कोण धावणार? नातेवाईक तरी किती वेळा धावणार? त्यांनासुद्धा काहीतरी अडचणी असणारच. अशा वेळी आपलं हक्काचं माणूस किंवा ठिकाण असलं तर …! भले त्यासाठी पैसे मोजायची तयारी आहे. पण अगदीच टिपिकल वृद्धाश्रम नको असतो, अशा सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन प्रकारच्या राहणीमानाचे पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. पहिल्या प्रकारात स्वतंत्र राहणी (Independent Living) आहे. ज्यात संपूर्णपणे कार्यकुशल म्हणजे स्वतःची कामे स्वतः सहजपणे करणारे ज्येष्ठ नागरिक राहतात. तर दुसऱया प्रकारात सहाय्यभूत राहणी (Assisted Living) असते. या राहणीमानात जे ज्येष्ठ नागरिक परावलंबी आहेत किंवा त्यांची नित्य कर्मे करण्यास त्यांना कोणाची तरी मदत लागते. आरोग्याच्या कायम तक्रारींमुळे आणीबाणीच्या प्रसंगी वैद्यकीय सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्याची असणारी निकड ज्या ज्येष्ठ नागरिकांना असते अशांसाठी हे सहाय्यभूत राहणीमान उपयुक्त ठरते.
स्वतंत्र आणि सहाय्यभूत राहणीमानाचे दोन्ही पर्याय असलेले अनेक प्रकल्प आज देशभरात उभे राहिले असून त्यात दरवर्षी भरच पडत आहे. वैद्यकीय सुविधा दिवसाचे चौवीस तास उपलब्ध करतानाच स्थानिक मोठय़ा इस्पितळांशी संलग्न असतात. आपत्कालीन समयी डॉक्टरसहित रुग्णवाहिकेची सुविधा असतेच. बंगळुरू इथे टाटा हाऊसिंग डेव्हलपमेंट कंपनीने आपला प्रकल्प स्थानिक अपोलो हेल्थकेअर इस्पितळाशी करारान्वये निगडित केला आहे. पुण्यातसुद्धा परांजपे स्कीम्सने ‘अथश्री’ ही ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीपश्चात घरांची निर्मिती केली आहे. अशा प्रकल्पांमध्ये घरे किंवा सदनिका घेताना सर्वसाधारणपणे वयाची मर्यादा असते. बहुसंख्य प्रकल्पांमध्ये सहभागी व्यक्तींचे वय किमान 55 वर्षे असले पाहिजे, अशी अट आहेच. सहाय्यभूत राहणीमानात वैद्यकीय सल्ल्यानुसार जेवणखाण्याची सुविधा दिलेली असते. स्वतंत्र राहणीमानात स्वतःच्या इच्छेनुसार खाद्यपदार्थ मागविता येतात. प्रसंगी स्वतःही आपल्या आवडीचे पदार्थ स्वतःच्या छोटय़ाशा स्वयंपाकघरात बनवू शकता. अगदीच कंटाळा आला तर ‘मेस’मध्ये खाण्याची सुविधा असते. स्वतंत्र आणि सहाय्यभूत राहणीमानाचे दोन्ही पर्याय असलेल्या प्रकल्पात तुमच्या मुलांना-नातेवाईकांना येण्याची – राहण्याची मुभा असली तरीही त्यावर ठरावीक दिवसांचे बंधन असते. स्वतंत्र राहणीमानात जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत मुलांचे-नातेवाईकांचे वास्तव्य सशुल्क मान्य केले जाते. सहाय्यभूत राहणीमानात जागेच्या उपलब्धतेनुसार कमाल पंधरा दिवसांपर्यंतच मुलांचे, नातेवाईकांचे वास्तव्य सशुल्क मान्य केले जाते.
स्वतंत्र राहणीमानात स्वतःच्या मालकीच्याच घरात किंवा सदनिकेत वास्तव्य असल्याने तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या वारसांकडे त्याची मालकी जाते. पण त्या प्रकल्पाच्या करारातील ठरवलेल्या अटींनुसार ते वारस जर निर्देशित केलेल्या वयोमानात उदा-55 वर्षांहून अधिक बसत असेल तरच ते या प्रकल्पात वास्तव्य करू शकतील किंवा ते घर किंवा सदनिका ज्येष्ठ नागरिकास विकू शकतील किंवा अन्य कोणाही ज्येष्ठ नागरिकास भाडेतत्त्वावर देऊ शकतात. सेवानिवृत्तीआधी किमान दहा ते पंधरा वर्षांत जर अशा प्रकल्पात गुंतवणूक केल्यास माफक दरात ही आधुनिक रिटायरमेंट होम्स उपलब्ध होऊ शकतात. पण कालांतराने आपले निर्णय बदलले गेले तर मात्र ही घरे विकण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात. ज्यांची मुले परदेशात आहेत किंवा मुलांशी पटत नसल्याने मुले लांब राहत असतील किंवा अपत्यच नसेल अशांना एक आरामदायी सुविधा पैसे देऊन घेण्याची तयारी आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. गरीब आणि मध्यमवर्गातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमाचा पर्याय असला तरीही त्यासाठी द्यावा लागणारा मासिक खर्च किती जणांना परवडू शकेल हा प्रश्नच आहे.
(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत)






























































