निवृत्त चालकाने साकारल्या एसटी बसच्या प्रतिकृती! उल्हासनगरच्या तानाजी जाधव यांचा अनोखा छंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहतुकीची कितीही साधने बदलली तरी लाल रंगाच्या एसटीविषयी सर्वसामान्यांच्या मनात आजही कुतूहल आहे. म्हणूनच सर्वसामान्यांची ‘लाल परी’ असेही एसटीला म्हटले जाते. लाल परीपासून ते अलीकडच्या शिवशाही, विठाईपर्यंतच्या एसटी बसच्या लहान आकारातील प्रतिकृती विठ्ठलवाडी डेपोतील निवृत्त चालक तानाजी जाधव यांनी साकारल्या आहेत. त्यांच्या या छंदाचे आता व्यवसायात रूपांतर झाले असून त्यातून त्रिमूर्ती लघुउद्योग आकाराला आला आहे. त्यांच्या या एसटीच्या प्रतिकृतींना राज्यभरातून मागणी आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथे राहणारे तानाजी जाधव हे विठ्ठलवाडी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. 27 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले आहेत. एसटी बसच्या प्रतिकृती साकारण्याची त्यांना आधीपासूनच आवड आहे. विठ्ठलवाडी डेपोत गणपतीच्या डेकोरेशनसाठी त्यांनी केलेली एसटी बसच्या प्रतिकृतींची आरास सगळ्यांनाच आवडली. त्यानंतर एसटीच्या प्रतिकृतीसाठी लोक त्यांना विचारणा करू लागले. 2005 साली त्यांनी बसच्या लाकडाच्या प्रतिकृती बनवायला सुरुवात केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करत 2015 साली त्रिमूर्ती लघुउद्योग सुरू केला. आता बारा वेगवेगळ्या प्रकारच्या एसटी बसच्या पत्र्याच्या प्रतिकृती ते तयार करतात. त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील त्यांना या कामात साथ मिळते. सर्वसामान्यांना परवडणारी अशी एसटीची ओळख असल्याने या प्रतिकृतींची विक्रीदेखील सर्वसामान्यांना परवडतील अशाच किमतीत जाधव कुटुंबीय करतात.

सर्वसामान्यांच्या मनामनात असलेली एसटी घराघरात पोहोचवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. एसटी बसची प्रतिकृती आपल्या संग्रही असावी म्हणून राज्यभरातून आम्हाला फोन येतात. महिन्याकाठी 80 ते 100 एसटी बसच्या प्रतिकृतींची विक्री होते. याद्वारे कुटुंबालादेखील हातभार लागतो.

तानाजी जाधव