
अलिबाग तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती. शिवसेना आणि शेकापच्या नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणूक न घेता सामंजस्यपणा दाखवून चारही जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी भरलेले अतिरिक्त अर्ज मागे घेतले ज्यामुळे निवडणूक अधिकारी रमेश चव्हाण यांनी चारही सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, मारुती भगत, शेकापचे विजय वरसोलकर, सदानंद मोरे हे यावेळी उपस्थित होते.
रेवदंडा ग्रामपंचायत निवडणूक 2018 साली झाली होती. या निवडणुकीत शेकापचा उमेदवार हा थेट सरपंच म्हणून निवडून आला होता. शिवसेनेचे 11 उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. मात्र प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 4 मधील शिवसेना उमेदवारांची जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्याने तिन्ही उमेदवार अपात्र ठरले होते. प्रभाग 5 मधील शेकाप सदस्या निकिता मानकर या मयत झाल्या होत्या. यामुळे या चार प्रभागांसाठीची पोटनिवडणूक 21 डिसेंबरला जाहीर झाली होती.

























































